कागलमध्ये आज पोस्ट कोविड केअर सेंटरचे उद्घाटन-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार उद्घाटन
कागल/प्रतिनिधी :कागलमध्ये आज रविवारी (ता.१) पोस्ट कोविड केअर सेंटरचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व नामवंत फुफ्फुस रोग तज्ञ डॉ. अजय केणी यांचे मार्गदर्शन होणार आहे. आरटीओ चेक पोस्टच्या गोडाऊन क्रमांक चारमध्ये सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती नगराध्यक्ष सौ. माणिक रमेश माळी यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोरोना महामारीमध्ये संभाव्य धोका ओळखून घ्यावयाची खबरदारी, बाधित झाल्यास उपचार व कोरोनामुक्तीनंतर घ्यावयाची दक्षता या विषयावर ॲस्टर आधार हॉस्पिटलचे डॉ. अजय केनी यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ असणार आहेत. दरम्यान; कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांवर आवश्यक उपचार व त्यांच्या समुपदेशनासाठी कागल येथे पोस्ट कोवीड सेंटर सुरु करणार असल्याचेही नगराध्यक्षा सौ. माळी यांनी सांगितले.
कोरोना महामारीच्या संसर्गामध्ये अहोरात्र, अविरत व निस्पृह सेवा देणारे ॲस्टर आधार हॉस्पिटलचे डॉ. अजय केनी यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्हाभर कोरोना नंतरचे जीवन या विषयावर व्याख्याने देऊन जनजागृती करण्याचा संकल्प केला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने झाली असून त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कागलमध्ये त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी कोरोनामुक्त झालेले रुग्ण तसेच इतर सर्वच नागरिकांनी त्यांच्या या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. माळी यांनी केले आहे. या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी, नगरसेवक व नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.