केडीसीसी बँकेची शेती व बिगरशेती संस्थांसाठी सामोपचार परतफेड योजना – बँकेच्या संचालक मंडळ बैठकीत निर्णय
कोल्हापूर/प्रतिनिधी : केडीसीसी बँकेने सन २०२२ -२३ या आर्थिक वर्षाकरिता थकबाकीदार शेती व बिगर शेती सहकारी संस्थांसाठी सामोपचार परतफेड योजना O.T. S. सुरू केली आहे. अध्यक्ष व आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.याबाबत अधिक माहिती अशी, बँकेच्या शेती कर्जे विभागाकडील थकबाकीदार विकास सेवा संस्था, दूध संस्था, पाणी पुरवठा संस्था तसेच इतर संस्थाना या योजनेत सहभाग घेता येणार आहे. ३१ मार्च २०१५ अखेर अनुत्पादित वर्गवारीमध्ये असलेल्या थकबाकीदार संस्थांना या योजनेसाठी पात्र आहेत. तसेच, या योजनेमध्ये ३१ मार्च २०१४ अखेर अनुत्पादित वर्गवारीमध्ये थबाकीदार असलेल्या सहकारातील नागरी पतसंस्था, नागरी बँका, ग्राहक संस्था, यंत्रमाग संस्था, औद्योगिक संस्था, मार्केटिंग संस्था, प्रक्रिया संस्था, खरेदी विक्री संघ, तोडणी वाहतूक संस्था, वाहनधारक संस्था, मजूर संस्था, कुक्कुटपालन आदी बिगर शेती संस्था सहभागी होण्यास पात्र आहेत.
या योजनेमध्ये समाविष्ट होणाऱ्या शेती संस्थांच्या शेतकरी सभासदांसाठी ८.०५ टक्के व संस्थांसाठी बँक पातळीवर ६.०५ टक्के दराने व्याज आकारणी होणार आहे. त्यातून थकबाकीच्या तारखेपासून आलेला वसूल वजा जाता सामोपचार परतफेडीची रक्कम निश्चित केली जाणार आहे. बिगर शेती संस्थांची थकबाकीच्या तारखेपासून ३१ मार्च २०१४ अखेर ८.०५ टक्के दराने व्याज आकारणी करण्यात येणार आहे. या आकारणीमधून आजअखेर आलेला वसूल वजा जाता शिल्लक रक्कम ही सामोपचार परतफेड योजनेची पात्र रक्कम म्हणून निश्चित केली जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेऊन ईच्छिणाऱ्या सर्व थकबाकीदार सहकारी संस्थांनी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २५ मार्च २०२३ अखेर आहे. योजनेत समाविष्ट होत असताना सामोपचारासाठी निश्चित केलेल्या रकमेच्या किमान २५ टक्के रक्कम ३१ मार्च २०२३ अखेर भरून बँकेशी करार करणे गरजेचे आहे. उर्वरित रक्कम ८.०५ टक्के व्याजासह कराराच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत भरायची आहे. अवसायानात गेलेल्या, विनोंदणी झालेल्या व दावा सुरू असलेल्या संस्थानाही या योजनेमध्ये सहभागी होता येईल.
यावेळी आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार अमल महाडिक, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व आय. बी. मुन्शी आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.केडीसीसी बँकेने सुरू केलेली सामोपचार परतफेडीची ही योजना म्हणजेच वन टाइम सेटलमेंट शेती आणि बिगर शेती प्रकारातील सर्व अनुत्पादित थकबाकीदार संस्थांसाठी संजीवनी देणारी आहे. या योजनेमध्ये जास्तीत जास्त थकबाकीदार संस्थांनी सहभागी होऊन, योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.