मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, साधू-संत – शास्त्रज्ञ – वैघ यांची देशभरातून मांदियाळी
अभूतपूर्व उत्साही वातावरणात ‘पंचमहाभूत लोकोत्सवास’ प्रारंभ
पंचमहाभूत लोकोत्सव लोकांची चळवळ बनून प्रत्येक घर पर्यावरण जागृतीसाठी कृतीशील व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर/प्रतिनिधी : आपला देश कृषीप्रधान असून आपण पूर्वापार निसर्गाची पूजा करतो. याच्या मुळाशी पर्यावरण रक्षण हाच हेतू आहे. शासनाचे प्रयत्नही सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आहे. यापुढील काळात आपल्याला सेंद्रीय शेती, गोशाळा यांसह प्रत्येक पर्यावरण उपक्रमास प्राधान्य द्यावे लागेल. त्यामुळे कणेरी मठावर आयोजित लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृती करायला हवी असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होत असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
या प्रसंगी प.पू. काडसिद्धेश्वरस्वामिजी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दिपक केसरकर ,खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार महेश शिंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महानगरपालिका प्रशासक आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे ,जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, ‘दैनिक’ पुढारी चे योगेश जाधव, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाने नागपूर समृद्धी महामार्गावर ३३ लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला विकास करतांना तो पर्यावरणपूरक असा करावा लागेल. या लोकोत्सवाच्या माध्यमातून त्याची व्याप्ती वाढवून ती राज्यव्यापी करावी लागेल आणि ती लोक चळवळ बनवावी लागेल ‘
या प्रसंगी तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘मानवी जीवनाशी निगडित असलेल्या पंचमहाभूतांच्या सजग जाणवेसह त्यांच्या होत असलेल्या प्रदुषणाविषयी व्यापक जनजागृती आणि सामुहीक प्रयत्न यांची अनुकरणीय कार्यकमपद्धती या लोकोउत्सवातील विविध विषयांवरील विचार मंथनातून नक्कीच विकसित होईल.’’
प्रारंभी सर्वांचे स्वागत करतांना सिद्धगिरी कणेरी मठाचे पू. काडसिद्धेश्वर स्वामिजी म्हणाले, ‘‘समाजातील विविध संस्था, संघटना आणि प्रशासन यांनी मिळून आपले सामूहिक दायित्व म्हणून पंचमहाभूताच्या मानवी हस्तक्षेपामुळे वाढत चाललेल्या प्रदुषणात आवर घालण्यासाठी सामूहिकपणे प्रयत्न करावेत. याचसमवेत उद्याच्या नागरिक असणार्या शाळेय आणि महाविद्यालयीन युवकांमध्ये पर्यावरणविषयी जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. त्याचा प्रारंभ या लोकोत्सवातून होईल असा विश्वास व्यक्त करत अवघा समाज भौतिक प्रगती वेगाने करत असतांना वेड्यांचे रुग्णालये वाढणे आणि मानसोपचारतज्ञांची संख्या वाढणे हे चिंताजनक आहे. त्याचे उत्तर या लोकोत्सवाच्या मंथनातून मिळेल असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.
आपण जर वेळीच जागृत झालो नाही, तर येणारी पिढी आपल्याला क्षमा करणार नाही – उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस
या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘आपण जर वेळीच जागृत झालो नाही, तर येणारी पिढी आपल्याल क्षमा करणार नाही, अशी सध्या स्थिती आहे. जगातील अनेक संस्कृतींचा र्हास झाला; मात्र भारतीय संस्कृती मात्र अद्यापही टिकून आहे. भारतीय संस्कृतीत नदीला माता मानले असून आपण पर्यावरणाला ईश्वर मानून कृती करतो. जल-वायू परिवर्तन ही आपल्यासमोरील गंभीर समस्या बनत असून भारत कर्करोगाची राजधानी बनतो का काय ? इतकी वाईट स्थिती आहे. कोल्हापूरच्या पंचगंगेच्या नदीची इतकी वाईट स्थिती आहे की तीला ‘गंगा’ म्हणावे का ? असे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यापुढील काळात पंचगंगेचे प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. यापुढील काळात आम्ही राज्यात २५ लाख हेक्टर सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणार आहोत. याचसमवेत कोळशापासून वीज उत्पादन अल्प करून सोलर उर्जा वाढवणे यांसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतीसाठी ८ हजार मेगावॅटचा प्रकल्प शेतकर्यांसाठी आम्ही सिद्ध करत आहोत. सरकार ज्या ज्या योजना आणते किंवा ज्या ज्या गोष् टींवर प्रबोधन करते त्यावर सामान्य लोक लगेच कृती करत नाही; मात्र जर तुमच्यासारख्या साधू-सन्यासी यांनी जर सांगितले, तर ते लगेच ऐकून कृतीत आणतात. त्यामुळे हा लोकोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.’’
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. भैय्याजी जोशी म्हणाले, ‘‘देवभूमी असलेल्या भारतात आपण जन्म घेतला हे आपणा सर्वांचे भाग्य आहे. पंचमहाभूतांचे रक्षण केल्यास आपले जीवन सुरक्षित राहिल. विकासाच्या मार्गावर आपण पुढे-पुढे जात असतांना तुर्कीसारखे मोठे मोठे भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ या समस्यांना आपल्याला का सामोरे जावे लागत आहे ? याचा आपण गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.’’ शेवटीविश्वस्त उदय सामंत यांनी आभार प्रदर्शन केल्यावर सामुदायिक राष्ट्रगीताने या उद्घाटन सत्राची सांगता झाली.
क्षणचित्रे
प्रारंभी कणेरी मठाची व्याप्ती, त्या माध्यमातून चालू असलेले विविध कार्य यांची माहिती देणारा एक दृकश्राव्यपट दाखवण्यात आला. उभारण्यात आलेल्या व्यासपीठ हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होते. येथे पृथ्वी, तेज, आकाश, वायू, जल यांची माहिती देणारे विशेष फलक उभारण्यात आले होते.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प.पू. काडसिद्धेश्वर स्वामिजी यांच्या विचारावर आधारित पत्रकार गुरुबाळ माळी यांनी लिहिलेल्या ‘सुमंगलम विचार संपदा’ या पुस्तकाच्या मराठी आणि कन्नड आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
चौकट
भारतीय जीवनपद्धतीत सन्यास’ पेक्षा कोणताही अलंकार मोठा नाही ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी
या प्रसंगी स्वामिजी म्हणाले, ‘‘मी कोणत्याही प्रकारची निवडणूक या जन्मात तरी लढवणार नाही. भारतीय जीवनपद्धतीत ‘सन्यास’ पेक्षा कोणताही अलंकार मोठा नाही आणि संन्यास हाच मोठा सन्मान आहे.’’
सकाळी तंत्र शिक्षणमंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तारांगणाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमस्थळी विविध आयुर्वेदिक, सेंद्रीय शेती उत्पादने, पारंपरिक बी-बियाणे, रोपे, तसेच मूल्यशिक्षण, धार्मिक ग्रंथ यांचे प्रदर्शन याचे कक्ष लावण्यात आले असून त्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे .