Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यानिसर्गातील अनेक कंदमुळाच्या वनस्पती पहावयास १२ आणि १३ जानेवारीस कोल्हापूरमध्ये या

निसर्गातील अनेक कंदमुळाच्या वनस्पती पहावयास १२ आणि १३ जानेवारीस कोल्हापूरमध्ये या

निसर्गातील अनेक कंदमुळाच्या वनस्पती पहावयास १२ आणि १३ जानेवारीस कोल्हापूरमध्ये या

कोल्हापूर/ प्रतिनिधी: निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. अनेक कंदमुळांच्या वनस्पती ह्या रानावनात, जंगलात वाढतात. अशा रानकंद वनस्पतींबाबतचे पारंपरिक ज्ञान वनवासी, आदिवासी आणि कोकणवासीयांच्याकडे आहे. अशाप्रकारच्या विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी, शेतकऱ्यांनी त्यांची लागवड त्यांच्या शेतात करण्याच्या हेतूने “निसर्ग अंकुर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅशन २४ ह्या संस्थेच्या आयोजनातून तसेच श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन क्लब कोल्हापूर, युथ ऍनेक्स, वुई केअर हेल्पलाईन ह्या संस्थांच्या सहकार्याने दिनांक १२ आणि १३ जानेवारी २०२३ रोजी ६० कंदमुळांचे माहितीपूर्ण प्रदर्शन शहाजी कॉलेज, यशवंतराव चव्हाण सभागृह, दसरा चौक, कोल्हापूर येथे १२ जानेवारी २०२३ – सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत १३ जानेवारी २०२३- सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती  मिलींद धोंड, प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ वनस्पतीतज्ञ प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर व संस्थेचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य प्राचार्य डॉ ..अशोक वाली यांनी लिहिलेल्या “औषधी रानभाज्या – प्रथम खंड “ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ह्या प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
ह्या प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहुणे माननीय डॉ. श्री. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ह्यांच्या हस्ते होणार असून माननीय श्री. बाबासाहेब वाघमोडे, प्रांताधिकारी गडहिंग्लज, माननीय श्री. उमेश पाटील, कृषी अधिकारी, कोल्हापूर, प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, माजी प्रभारी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ, डॉ. सौ. गीता पिल्लई, अध्यक्ष, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रदर्शनाचा सोहळा पार पडणार आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर तसेच इतर मान्यवर देखील ह्या प्रदर्शनाला विशेष भेट देणार आहेत. लोकांना कंदमुळांची ओळख आणि चांगली माहिती मिळावी म्हणून मोहन माने ह्यांच्या अथक प्रयत्नातून हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. अगदी पुरातन पौराणिक काळापासून मानव कंदमुळांचा अन्न म्हणून वापर करत आला आहे. शतावरी, अमरकंद, सफेद मुसळी, पेनवा इत्यादी वनस्पतींच्या कंदाचा औषधात वापर करतात. गाजर, मुळा, बीट, आले, हळद, कांदा, लसूण इत्यादी वनस्पतींच्या कंदाचा आपण आपल्या आहारात वापर करतो. अळू, कमळं, सुरण हे कंदही भाजीसाठी वापरतात. साबु कंदापासून साबुदाणा तयार करतात. मानवी आहारात उपयुक्त असणाऱ्या अशा बहुतांश कंदवर्गीय वनस्पतींची शेतात लागवड केली जाते.
हे प्रदर्शनात कणगा, काटे कणग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, शेंडवेल, आळसी,
शेवळा, सुरण ह्या वनस्पतींची कंदमुळे, कंदीका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू, काळा अळू, हिरवा अळू, पांढरा पेरव, उंडे, शेडवाळे असे अळुंचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद, त्याचबरोबर काळी हळद, आंबेहळद ह्या सारखे हळदीचे
विविध प्रकार व त्यांचे कंद इ. अशाप्रकारच्या सुमारे ६० प्रकारच्या कंदाच्या जाती प्रजातींची मांडणी ह्या प्रदर्शनात केली जाणार असून एकूण ६० कंदांच्या प्रकारांपैकी १५ ते २० प्रकारचे कंद विक्रीसाठी उप्लब्ध असून सुमारे ६ ते ७ प्रकारच्या
कंदांच्या पाककृती बाबतची माहितीही सर्व उपस्थितांना ह्या प्रदर्शनात दिली जाणार आहे. ह्या वेळी हौशी खवय्यांना कंदांपासून तयार केलेल्या विविध पदार्थांची चवही चाखता येणार आहे. प्रदर्शनात ठेवण्यात येणाऱ्या कंदांचे संकलन
प्रामुख्याने कर्नाटकातील जोयडा, महाराष्ट्रातील बेल्हे (पुणे) व गगनबावडा (कोल्हापूर) येथून करण्यात येणार आहे.लेट्स गेट बँक टु अवर रूट्स “ह्या ब्रीदवाक्याचा अंगिकार करून आपल्या मातीत वाढणाऱ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती घेऊन चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी, आबालवृद्ध तसेच सर्व नागरिकांनी एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन एनजीओ कम्पेंशन २४, कोल्हापूर वुई केअर चे अध्यक्ष मिलिंद धोंड ह्यांनी केले आहे.
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे.
ह्या प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी असून प्रोजेक्ट डायरेक्टर अमृता वासुदेवन आहेत.
ह्या प्रदर्शनासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेस सुशांत टक्कळकी, अमृता वासुदेवन प्राचार्य डॉ.अशोक वाली, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत, मंजिरी कपडेकर, पल्लवी कुलकर्णी, मधुरा हावळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments