कोल्हापूर येथे दिनांक २० ते २२ जानेवारी २०२३ रोजी “इंडियन डेअरी फेस्टिवल २०२३” चे आयोजन- चेतन नरके यांची माहिती
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इंडियन डेअरी असोसिएशन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सहकायनि कोल्हापूर येथे दिनांक २० ते २२ जानेवारी २०२३ रोजी इंडियन डेअरी फेस्टिवल २०२३ चे आयोजन केले आहे.”नांदी.. नव्या धवल क्रांतीची” हे घोषवाक्य घेऊन आणि सद्यस्थितीतील पशुधन आणि डेअरी क्षेत्रातील उपलब्ध पायाभूत सुविधांच्या बळावर अधिक आणि गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन, संकलन आणि प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि यातून फायदेशीर पशुपालन आणि डेअरी उद्योग हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके,माजी संचालक अरुण नरके यांनी पत्रकार परिषदेत दिली. या फेस्टिवल मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांतील सहकारी आणि खासगी दूध संघ, देशातील अनेक नावाजलेल्या डेअरी सहभागी होत आहेत.तीन दिवस चालणाऱ्या या फेस्टिवल मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर विभागात प्रथमच अशा प्रकारच्या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.देशातील दुग्ध व्यवसायासमोरील संधी, आव्हाने, दूध उत्पादनात वाढ आणि २०३० पर्यंतची ध्येयधोरणे ठरवण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ, सर्व घटक आणि शासन व्यवस्था यांना एकत्रित घेऊन हॉटेल सयाजी येथे दूध परिषदेचे आयोजन केले आहे. या सोबत दूध उत्पादक शेतकन्यापासून, दूध संस्था, दूध प्रक्रिया संघ आणि ग्राहक या सर्व घटकांना लागणारी आवश्यक माहिती, तंत्रज्ञान एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी शाहूपुरी जिमखाना मैदानावर “भव्य डेअरी एक्स्पो २०२३” होणार आहे. या डेअरी उद्योगात काम करणाऱ्या आणि हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वांना पशुसंवर्धन आणि डेअरी उद्योगाची माहिती करून देणारे एक पुस्तक यावेळी प्रकाशित करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांचे एका व्यापक चळवळीत रुपांतर करण्यासाठी विविध माध्यमातून याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी पुढील एका वर्षातील उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. नव्या पिढीचा सहभाग या क्षेत्रात वाढवण्यासाठी या उद्योगाचे अर्थकारण, तंत्र, महत्व आणि मार्गदर्शन समजून देण्यासोबत सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये डेअरी उद्योगाचा वाटा वाढवण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या प्रयत्नांना गती देण्याच्या दृष्टीने हे फेस्टिवल महत्वपूर्ण ठरणार आहे. १९७० ते १९९६ पर्यंत एकूण २६ वर्षे कार्यरत असणाऱ्या ऑपरेशन फ्लडच्या माध्यमातून भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला आहे.डेअरी हा आता फक्त कृषी पूरक उद्योग राहिला नाही. या उद्योगाचे एक स्वतंत्र स्थान निर्माण झाले आहे. जी.डी.पी. मधील त्याच्या योगदानातून या क्षेत्राने ते सिद्ध केले आहे. आज महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था या दूध व्यवसायावर अवलंबून आहे. सहकाराची कास धरत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जिल्हा आणि तालुका दूध संघ निर्माण झाले आहेत.अलीकडच्या काळात पशुसंवर्धन आणि दूध प्रक्रिया उद्योगात खासगी क्षेत्राने मोठ्या प्रमाणात केलेल्या भांडवली गुंतवणूक, नवं तंत्रज्ञान, आधुनिक यंत्र सामुग्री याच्या जोरावर बन्याच खासगी संस्थांनी बाजारपेठेतील आपला वाटा वाढवण्यास सुरुवात केली आहे.यामुळे डेअरी उद्योगाचा विस्तार झाला आहे.या सर्व गोष्टी सकारात्मक दिसत असल्या तरी नैसर्गिक संकटे, जागतिक स्पर्धा, धोरणे, व्यावसायिक दृष्टिकोन आणि भविष्यकालीन नियोजनाविषयी अभाव, या सर्वामुळे अमर्याद संधी असणाऱ्या या व्यवसायासमोर नवनवीन आव्हाने देखील निर्माण झाली आहेत.काळानुसार बदलणारी व्यावसायिक समीकरणे जुळवण्यात त्यातील बहुतांश दूध संघाना अपयश आले असून सद्यस्थितीला काही मोजके दूध संघ वगळता अनेक सहकारी दूध संघांची अवस्था बिकट बनली आहे. सदर इंडियन डेअरी फेस्टिवल हे एका नव्या धवल क्रांतीचे पूरक ठरेल असा आशावाद चेतन नरके यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. अलीकडच्या काळात दूध उत्पादकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे दुष्काळ अतिवृष्टी वातावरणात होणारे बदल याचा पशुपालनावर मोठ्या प्रमाणावर होत असले तरी हा शेतीपूरक व्यवसाय म्हणूनच केला जातो. एक दोन जनावरांमुळे हा व्यवसाय फायदा देत नाही चारा उपलब्धतेचा अभाव पशुखाद्याचे वाढलेले दर दुधाला मिळणारा भाव उत्पादनातील साऱ्यांवर खर्च होणारे ७० टक्के रक्कम देखभाल आणि उत्पादन खर्चात होत असलेली मोठी वाढ यामुळे छोट्या दूध उत्पादकांना हा व्यवसाय करणे अवघड झाले आहे. या व्यवसायाला अनेक पैलू असल्याने दरासाठी विशेष निकष कायम करता येत नाहीत. त्यामुळे दुधाला सरसकट हमीभाव देणे सोपे नाही त्यातच शेतकरी कुटुंबातील नवी पिढी हा पारंपारिक शेती पूरक व्यवसाय करण्यात नाखुश आहे. राज्यातील अनेक दुधाळ जनावरे कुपोषित आहेत. त्यांचे निराकरण केल्याशिवाय कमी खर्चात दुधाचे अधिक उत्पन्न घेता येणार नाही. व्यावसायिक पातळीवर देखील नवनवीन आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. गुणवत्ता पूर्ण दूध संकलनाचा अभाव, दूध दरातील फरकामुळे उत्पादकांकडून म्हशीच्या दुधात गाईच्या दुधाची होणारी भेसळ, फॅट आणि एस.एन.एफ वाढीसाठी साखर युरिया यासारखी भेसळ, काही व्यापाऱ्यांकडून होणारी रासायनिक पदार्थांची भेसळ आणि कृत्रिम दुधाची निर्मिती यामुळे जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी आवश्यक गुणवत्ता राखण्यात अपयश येत आहे. त्यामुळे या व्यवसायातील अडचणी अधिकच वाढत चालल्या आहेत. जगाच्या पाठीवर डेअरी उद्योगात भारताला सर्वाधिक संधी आहे.आज जगातील एकूण दूध उत्पादनाच्या २३ टक्के उत्पादन भारतात होते. २०२३ पर्यंत ३३%पर्यंत जाईल तर २०६७ पर्यंत जगातील ६८% दुधाचे उत्पादन एकट्या भारतात होईल. पण पारंपारिक उंबरठ्यावर उभे राहून आपण जागतिक स्पर्धेला सामोरे जाऊ शकत नाही.यासाठी स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करणे आवश्यक आहे. निर्माण झालेल्या जागतिक स्पर्धेला यशस्वीपणे तोंड द्यायचे असेल आणि आपली हक्काची बाजारपेठ कायम ठेवून जगाच्या बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करायचे असेल तर दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी नियोजन आणि कालबद्ध कृती कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. यासाठीच या सर्वांवर विचार या एक्सपोर्टच्या माध्यमातून केला जाणार आहे. शासन व्यवस्था, दूध संस्था, दूध उत्पादक यांच्यासह या व्यवसायाशी निगडित सर्व घटकांनी एकत्रितपणे लोक चळवळ उभी करावी लागेल आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी यामध्ये सातत्य राखण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. यासाठीच हा उपक्रम हाती घेण्यात आला असून दूध उत्पादक दूध संस्था आणि डेअरी उद्योगातील सर्व घटकांच्या दृष्टीने या फेस्टिवलचे आयोजन हा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. असे यावेळी सांगण्यात आले.यावेळी अरुण नरके, स्फूर्तीचे किरीट मेहता,आबासाहेब थोरात,गिरीष चितळे,संजीवन नाईक निंबाळकर, आकाश कोतवाल,विशाल पाटील,अनिल हेरले,डॉ. जी.बी.पाटील,नेताजीराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.