कोल्हापुरात झोपडपट्टीला भीषण आग शिवाजी पार्क इथल्या इंदिरानगर झोपडपट्टी इथली घटना
लाखो रुपयांचे नुकसान महिलांनी फोडला टाहो
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील शिवाजी पार्क परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये आज दुपारच्या दरम्यान अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एका घरातील तीन गॅस सिलिंडरच्या गळतीने अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली .झोपडपट्टीतील दाटीवाटीने असलेल्या घरांमुळे आगीने रौद्ररूप धारण करून हि आग पसरली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे सहा बंब दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले. अचानक लागलेल्या आगीने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. या आगीमध्ये झोपडपट्टीतील ४ ते पाच घरे जाळून खाक झाली आहेत. त्याचबरोबर आजूबाजूच्या घरांना देखील झळा लागल्या आहेत . स्थानिक नागरिकांनी याठिकाणी धाव घेत घरातील साहित्य बाहेर काढण्यास सुरवात केली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी आपल्या डोळ्यांसमोर संसार जाळून खाक झाल्याचे पाहून संबंधित घरातील महिलांनी प्रशासकांसमोरच टाहो फोडला.