Sunday, December 22, 2024
Home ताज्या बॅरिस्टर’ कलाकार : विक्रम गोखले

बॅरिस्टर’ कलाकार : विक्रम गोखले

बॅरिस्टर’ कलाकार : विक्रम गोखले

‘यशाचे असंख्य दावेदार असतात,परंतु अपयशाला मात्र बाप नसतो आणि म्हणून वळणवाटा शोधताना आपल्या अपयशाचे आपण बाप झालो,तर प्रश्न लवकर सुटतात आणि एकदा अपयशाचं गणित आपलं आपल्याशी मांडता आलं की मग आपल्या यशाबाबतही आपण दावेदारांना दाराशीही उभे करत नाही’ असे परखड मत असणारे होते विक्रम गोखले. ‘बॅरिस्टर’ मधल्या रावसाहेबपासून ते ‘के दिल अभी भरा नही’ मधल्या अरुण निगवेकर नावाच्या एका सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेपर्यंत आपल्याला स्तिमित करणारी कामगिरी ज्या अभिनेत्याच्या नावावर आहे.
गर्दीत वावरताना सुद्धा एखादी व्यक्ती आपलं लक्ष वेधून घेते.त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व,त्याचं सहज बोलणं,हळूवार हातवारे,बोलके डोळे,संवादाची फेक सगळं सगळं आपल्याला नकळत ते त्यांच्याकडे खेचत.आपण कधी कधी चोरून तर कधी कधी अनाहूतपणे त्यांच्याकडे पहात राहतो असं चुंबकत्व ज्या कलाकाराकडे प्रकर्षाने जाणवलं ते होते विक्रम गोखले.अनेक कलाकार व्यक्तिमत्वाची छाप पाडण्यात सरस असतात; पण ते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू शकतीलच असे नाही,पण त्यासाठी आवश्यक असणारं जे मैग्नेट हवं ते विक्रम गोखले यांचेकडे होतं.प्रकाशझोतात उजळून जाणाऱ्या विद्युतभरीत अवकाशात ज्याच्या मुखातून उमटणाऱ्या शब्दांनी अवकाश भारून टाकण्याची किमया केली असे विक्रम गोखले.ज्यांच्या रंगमंचीय आविष्काराने प्रेक्षक दिपून गेले.
अभिनयाचा आणि संगीताचा जन्मजात वारसा लाभलेल्या विक्रम गोखले यांनी हिंदी आणि मराठी चित्र- नाट्यसृष्टीत तसेच दूरदर्शन मालिकातही अढळपद निर्माण केले. स्पष्ट आणि स्वच्छ शब्दोच्चार,उत्तम संवादफेक,देखणे-रुबाबदार व्यक्तिमत्व आणि अभिनयातील सहजता या त्रिवेणी संगमातून मराठी आणि हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या.प्रत्येक यशस्वी माणसाचं यश हे त्याच्या आयुष्यातल्या वळणांनी शोध घेतलेल्या वेगवेगळ्या वाटांचं असतं.प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतोच.त्यातून कधी यश येतं,कधी अपयश; पण यशस्वी माणसं त्या अपयशालाही स्वत:चा एक अर्थ लावतात,आणि म्हणूनच त्यांची वाट नितांत आनंदाची,समाधानाची होते.ज्यांनी स्वत:च्या आयुष्यातील वळणवाटांना असा अर्थ दिला आणि आयुष्याला वाहतं केलं असे ते कलाकार होते.भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या नायिका म्हणून लौकिक असलेल्या कमलाबाई गोखले या त्यांच्या आजी आणि चरित्रनायक म्हणून ठसा उमटवणारे चंद्रकांत गोखले हे त्यांचे वडील.कलाप्रेमी कुटुंबात आणि हेमावती गोखले या आईच्या संस्कारात विक्रम गोखले यांच्या मनात कलेवरची निष्ठा रुजणे स्वाभाविक होते.अभिनयाचा वारसा घरातूनच लाभलेल्या विक्रम चंद्रकांत गोखले यांचा जन्म ३०ऑक्टोबर१९४५ रोजी पुण्यात झाला.त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूल व वि.र.वेलणकर हायस्कूल येथे झाले,तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एम.ई.एस.(आताचे आबासाहेब गरवारे)महाविद्यालयात झाले.शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
तोपर्यंत त्यांच्या वडिलांची महाराष्ट्रीय मनात एक प्रतिमा तयार झालेली होती.त्यांच्या वडिलांच्या भूमिका पाहून लोकांनी ठरवून टाकलं होतं की,चंद्रकांत गोखले हे अत्यंत शांत स्वभावाचे,अत्यंत सहनशील असे एक गृहस्थ असावेत.प्रत्यक्षात त्यांचे बाबा हे जमदग्नी होते.त्यांच्या ८७ व्या वयातही विक्रमजी त्यांच्या नजरेला नजर देऊ शकले नव्हते.ते सदगृहस्थ होते,सदविचारी होते,फारच खरे होते आणि बहुधा फार सरळ व रोखठोक असल्यामुळे ते संतापी होते.या कलाकाराची मनस्वी इच्छा होती की,आपल्या मुलाने शास्त्रीय गायक व्हावं आणि नंतर गायक नट म्हणून संगीत रंगभूमीवरही कामं करावीत.ते त्यांना खूप वेळा खूप ठिकाणी खूप मोठ्या कलावंताचं गायन,वादन ऐकण्यासाठी घेऊन जात.उदा : उस्ताद बडे गुलाम अली खां,कुमार गंधर्व,मल्लिकार्जुन मन्सूर,भीमसेन जोशी,प्रभाताई अत्रे,किशोरीताई अमोणकर,डागरबंधू,सलामत अली,नजाकत अली तसेच वादकांपैकी उस्ताद अहमद जान थिरकवा,लालजी गोखले,छोटबा गोखले,विजय दुग्गल इ.पण त्यातून एक गोष्ट झाली की, विक्रमजी तानसेन झाले नाहीत तरी जबररदस्त कानसेन मात्र झाले.त्यामुळे ते तानपुरा सुध्दा फारच सुरेल लावायचे,अगदी जवारीसकट.
पानशेत आणि खडकवासला धरणं फुटून अर्ध पुणं पाण्याखाली गेलं तेव्हा ते नववीत शिकत होते.
त्यांच्या घरावरही वीस-पंचवीस फूट पाणी होतं.त्यावेळी तत्कालीन मराठी नाट्य व्यावसायिक मंडळी
त्यांच्या घरी आली आणि त्यांना आर्थिक मदत घेण्याचा आग्रह करू लागली.पण त्यांच्या वडिलांनी एक रुपयाही घेतला नाही.ते नि:शब्दपणे अश्रुपात करत होते.ते म्हणाले,‘ज्यांची घरंच पायापासून या धरणफुटीने उखडून नेली त्यांचं दु:ख,यातना काय असतील?’. धरणफुटीमुळे या कुटुंबाच्या वाट्याला उपासमार,दारिद्र्य,कपडे,वस्तू या गोष्टी बरेच दिवस नसणे हे सर्व आलं;परंतु तशाही परिस्थितीत आपल्यापेक्षा अधिक दु:खात,संकटात असलेल्यांचा विचार मनात जागता ठेवणं हे विक्रमजी वडिलांकडून शिकले.
साठच्या दशकात मराठी चित्रपटांत मिळेल ती भूमिका करणं,समोर आलेल्या तत्कालीन सामान्य मराठी नाटकांतून मिळतील त्या भूमिका स्विकारत राहणं आणि मिळतील त्या पैशातून वडिलांना काहीशी का होईना,पण भावंडांमधला थोरला या नात्यानं मदत करण्याचा प्रयत्न करणं हे त्यांनी आनंदानं केलं.शैक्षणिकदृष्ट्या ते स्वत:ला अपयशी मानत.नोकरी न करता बिनभरवाशाच्या क्षेत्रात उडी मारुन त्यांनी आयुष्यात खूप सोसलं. आर्थिक धाडस करणं हा त्यांचा नेहमीचाच एक छंद.बालवयातच त्यांनी नाटकांमध्ये कामे करायला सुरुवात केली.बालकलाकार म्हणून त्यांनी ‘आग्र्याहून
सुटका,राजसंन्यास,बेबंदशाही’ या नाटकांमध्ये भूमिका केल्या.तर याच काळात त्यांनी ‘शेवग्याच्या शेंगा’ या चित्रपटात पहिल्यांदा अभिनय केला. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे त्यांचे
व्यावसायिक नाटक होय.मराठी चित्रपटात नायक म्हणून ‘अनोळखी’ हा त्यांचा पहिला चित्रपट
होता.
गोखलेंनी आपल्या कारकिर्दीत नाटकं चोखंदळपणे निवडली आणि प्रत्येक भूमिका तन्मयतेने केली.मराठी नाट्येतिहासात संस्मरणीय व्यक्तिरेखा ज्या साधारण होत्या,त्यातही काही वेगळं सापडतं आहे का किंवा जे नेहमीचंच आहे ते वेगळ्या रीतीने करता येतंय का,हे बघण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला.विविध पिंडप्रकृतीच्या भूमिका त्यांनी आव्हान समजून केल्या.त्या प्रत्येक भूमिकांमागचं त्यांचं वृत्तीगांभिर्य आणि शिस्त कधी कधी टोकाची वाटावी अशी होती.प्रेक्षकांचा बेशिस्तपणा त्यांनी खपवून घेतला नाही.प्रयोगाच्या वेळी आपल्या बडबडीने किंवा मोबाईलच्या रिंगटोनने व्यत्यय आणणाऱ्या प्रेक्षकांना त्यांनी अनेकदा प्रयोग थांबवून इशारा दिलेला आहे.नाटक ही गंभीरपणे आणि एकाग्रतेने करण्याची,बघण्याची गोष्ट आहे याचं नैतिक भान त्यांनी स्वत:बाळगलं आणि त्याची जाणीव इतरांना करून दिली.त्यांचं मराठी रंगभूमीशी अभिनेता म्हणून गेल्या कित्येक वर्षांचं नातं होतं.मात्र हा २४ फुटांचा रंगमंच एवढाच त्याचा आवाका आणि त्याची पोकळी आहे,असं ते मानत नसत,तर असीम आकाशाएवढा त्याचा अवकाशपट असतो असं ते मानत.अभिनेता अनेक भाषा,भूमिका आणि रूप रंगातल्या भूमिका त्यावर सजीव करतो.गायकांच सुरेल स्वरांशी जे नातं असतं तशी एकतानता रंगमंचावर नाटकातल्या त्या त्या भूमिकेशी जुळून येत असते.तरी व्यक्तिश: स्वत:ला न विसरता सावधपणे फक्त भूमिकेची अभिव्यक्ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे कलाकाराचे काम असते.त्यामुळे प्रेक्षक त्या वेळी त्या ‘व्यक्ती’ला विसरून नाटकातल्या त्याच्या सुष्ट-दुष्ट भूमिकेशी समरस होतात आणि आनंद घेतात.
एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं,वास्तव आणि आभासाचं योग्य प्रमाण आणि समतोल साधण्याचा सुजाण शहाणपणा नटानं त्या वेळी सावधपणे बाळगायला हवा.माझ्या सावधपणाची ही परीक्षा ‘स्वामी’ या रणजीत देसाई लिखित नाटकात रंगमंचावर प्रवेश चालू असतानाच मला द्यावी लागली.प्रसंग असा होता,माधवराव पेशवे (मी) काकांवर म्हणजे राघोबादादांवर अत्यंत चिडलेले आहेत.रागाच्या भरात ते म्हणतात, ‘तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याला आम्ही हत्तीच्या पायी दिले असते!’ त्या वेळी आनंदीबाई येऊन हात जोडून माधवाची विनवणी करत म्हणतात, ‘नको रे माधवा.मी भीक मागते रे,पदर पसरते.माझ्या कुंकवाला धक्का लावू नकोस रे,माधवा’ आणि मी माघार घेतो.पण या दिवशी हे वाक्य बोलणाऱ्या ‘आनंदीबाई’नी रंगमंचावर प्रवेशच केला नाही.राघोबा तर गप्प राहिले.कारण इथे त्यांना वाक्य नव्हते.मग माझ्यातल्याच सावध अभिनेत्याने काकांना (हजर)जबाब दिला.‘पण काकाss,आम्ही काकूंच्या कुंकवाला धक्का लावणार नाही.तेवढे बळ आमच्यात नाही !’.आनंदीबाईंच्या भूमिकेतील आशालताबाईंची वेळेवर एंट्री न झाल्याने, प्रसंगावधान राखून त्यांच्या तोंडचे वाक्य मी बोललो.या प्रसंगातील ते वाक्य घेण्यानेच आमच्या नाटकाची गाडी पुढे सुरळीत चालू झाली.नाहीतर पेशवाईवर बाका प्रसंग ओढवला असता.‘संकेत मिलनाचा’ या सुरेश खरे लिखित नाटकात मला वेगळीच भूमिका वठवायची होती.या
नाटकात नायक म्हणजे मी सबंध नाटकभर आपल्या पत्नीशी सतत फोनवर बोलत असतो.ती पत्नी व्यक्ती म्हणून प्रत्यक्ष स्टेजवर कधीच येत नाही.ही माझी व्यक्तिरेखाही त्यामुळे वेगळी आणि आव्हानात्मक ठरते.असा हा अभिनयही अवघडच म्हणायचा.परंतु लेखकानेही त्या संवादामध्ये एकसुरीपणा किंवा कंटाळा येऊ नये म्हणून नाती आणि भावना गुंफल्या आहेत.त्यातून वेगवेगळे संकेत मिळतात.उदा : कधी तो पत्नीशी त्या दोघांच्या मुलीबद्दल लाड,कौतुक करण्याच्या भाषेत,स्वरात बोलतो,तर कधी पत्नीशी समजावणीच्या,संयमाच्या सुरात बोलतो.या ‘दूरवाणी’ तून संवाद करण्याचे कारण काय,तर हा पत्नीशी संवाद चालू असताना त्याची प्रेयसी त्याच्या समोर बसलेली प्रेक्षकांना दिसत असते.तेव्हाच दुसरीकडे तो तिच्याशी नेत्रसंवाद,चेहऱ्यावरचे हावभाव,हाताबोटांचा उपयोग करून बोलत असतो.एकाच भूमिकेत,एके जागी बसून फोनबोली आणि मूकाभिनयातून संवादाच्या शैली आणि शक्तीने या दोन अंकी नाटकाचा प्रयोग रंगभूमीवर होतो,त्याला प्रेक्षकांची उत्तम दाद मिळते.एकट्या पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात या नाटकाचे ५३ प्रयोग हाउसफुल्ल झाले. यासाठी नुसते पाठांतर नाही तर एकाग्रता,बेअरिंग सहजता अशा अभिनयक्षमतेची गरज असते.नटाने स्वत:ला साचेबंद भूमिकेत अडकवून घेऊ नये.एका चाकोरीतल्या या अभिनयामुळे तुमची हमखास लोकप्रिय कलावंताची एक प्रतिमा तयार होते.भरपूर प्रसिद्धी,कौतुक आणि पैसा ही तुमच्या पदरात पडतो.पण नट म्हणून आपला कस,आपली इयत्ता वाढवायची असेल तर अगदी वेगवेगळ्या भूमिकांमधून स्वत:ला सिद्ध करून दाखवावं लागतं हे विक्रमजींनी उदाहरणाने दाखवून दिले.‘राहू केतू’ उर्फ ‘छुपे रुस्तम’ या नाटकातला त्यांचा पोलीस इन्स्पेक्टरही असाच वेगळा होता. ‘नकळत सारे घडले’ मधला बटुमामा म्हणजे व्यक्तिमत्वाचं एक वेगळंच रसायन होतं.तो स्वत: अविवाहित आहे.त्यांच्याकडे त्यांचा एक किशोरवयातल्या भाचा रहायला येतो.त्याच्यासाठी एक स्त्री समुपदेशक तिथे येऊ लागते.तिच्या शिकवण्या,सांगण्यातून मामाला भाच्याची वागणूक,त्याची संवेदना हळूहळू उशिरा जाणवते.हे सर्व या भूमिकेत अभिप्रेत आहे.मामाचं आणखी एक रूप म्हणजे या घरात बायका जी कामं करत असतात ती तो अगदी सहज,सफाईदार,स्त्रीसुलभ पद्धतीने पार पाडत असतो.म्हणूनच ही भूमिका रंगमंचावर साकार करणे अगदीच अवघड होते.
गायकाच्या बाबतीत,त्याचा गाता गळा त्याच्या ‘दिल और दिमाग के बीच में होता है’ असं म्हंटल
जातं.तसा समतोल त्यांनी त्यांच्या नाटकातल्या भूमिका वठवताना सांभाळला.‘ झोकून देणे आणि हातचे राखून ठेवणे या दोन्हीच्या मध्यावर मी अभिनयाचा तराजू ठेवतो.मी एक पंचाक्षरी सूत्र वापरून स्वत:ला कारण आणि प्रश्न विचारतो का?काय?कुठे?कसे?केव्हा? या प्रश्नांच्या प्रामाणिक उत्तरातून मी तारतम्यानं भूमिकेतल्या अभिनयाचं प्रमाण ठरवतो.’ असं ते म्हणत. ‘कमला’ नाटकाचे प्रयोग करताना त्यांना प्रयोगशीलतेचं एक वेगळं समाधान मिळत होतं.या भूमिकेसाठी त्यांना त्या वर्षीच्या नाट्यदर्पणचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला.त्यांनी ‘कमला’ चे अंदाजे १३० प्रयोग केले आणि महाराष्ट्र ढवळून निघाला.त्यांच्यातल्या कलाकाराचा शोध ज्या नाटकातून त्यांना घ्यायला मिळाला त्यापैकी एक ‘बॅरिस्टर’ हे नाटक, जे त्यांच्या नाट्यप्रवासातला ‘मैलाचाच’ नव्हे तर ‘मोलाचा’ दगड ठरला.ही भूमिका जयवंत दळवींनी अनेक पैलू पाडून घडवलेली आहे.मनस्वी,हळवा पण मनाने अस्थिर अशी व्यक्तिरेखा त्यांना जिवंत करायची होती,ते घर रूढी परंपरात रुजलेलं.त्यात रुतलेली मावशी आणि राधा.या
वातावरणात फुलणारा आणि कोमेजणारा हा जीव.आता ती पात्रं ‘कालबाह्य’ वाटत असली तरी
आजही त्यातली चिरवेदना आपल्यात झिरपते.हे नाटक आपल्या आत्म्याशी संवाद करते आणि आपल्या हळव्या जाणीवा जाग्या करते.काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘बॅरिस्टर’ हे नाटक दिग्दर्शित करून आपण एकेकाळी चिरस्मरणीय केलेली भूमिका शैलेश दातार या नटाकडून अप्रतिमपणे करवून घेतली होती.
सुरेश खरे लिखित ‘सरगम’ नाटक.या नाटकातील भूमिकेने एक वेगळा अभ्यास आणि आभास निर्माण करण्याची कला त्यांच्यात जागवली.ती म्हणजे प्लेबॅकची.प्लेबॅक देणे आणि घेणे ही एक जिवंत कला आहे.हे नाटक रिअलिटी शोमध्ये गाणाऱ्या बालकलाकारांचे नाटक आहे.त्यात त्यांची भूमिका
बुजुर्ग,खानदानी,घरंदाज गायकाची होती.शास्त्रीय गाण्याची बैठक त्यांना सजवायची होती.गात नसले तरी लहानपणापासून अगदी उत्तमोत्तम गायकांचं गाणं त्यांनी मन लावून आणि मनापासून ऐकलेलं होतं.ते गायक,गायिका,ते चेहरे,त्यांचे हावभाव,ओठांची हालचाल,गळ्याच्या ताणलेल्या शिरा हे सर्व आठवून रंगमंचावरच्या गाण्याच्या मैफलीत त्यांनी मांडी ठोकली. गायकाचा तो आभास व्यक्त करण्यात ते यशस्वी झाले असं म्हणता येईल.कारण प्रत्यक्ष गानसरस्वती किशोरीताई आमोणकर त्यांच्या गाण्याचा हा अभिनय खराखुरा समजल्या.त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं.हीच त्यांच्या अभिनयाची मोठी पावती आहे.विक्रम गोखले यांनी ‘अपराध मीच केला.वेगळं व्हायचंय मला,जास्वंदी,स्वामी,महासागर,जावई माझा भला, बॅरिस्टर,दुसरा सामना,मकरंद राजाध्यक्ष,संकेत मिलनाचा,खरं सांगायचं तर,आप्पा आणि बाप्पा,नकळत सारे घडले’ अशा बऱ्याच नाटकांमध्ये मुख्य भूमिका केल्या होत्या.नाटकांसोबत त्यांनी अनेक चित्रपटातही वेगवेगळ्या भूमिका रंगविल्या. ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटात आशा काळे,नयनतारा,सतीश दुभाषी अशा कलाकारांच्या बरोबर त्यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली.१९८९ मधील ‘कळत नकळत’ आणि १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ या दोन्ही मराठी चित्रपटांत परस्परांहून वेगळ्या भूमिका त्यांनी ताकदीने उभ्या केल्या.याशिवाय ‘कुंकू,मुक्ता,लपंडाव’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या.तसेच ‘वऱ्हाडी आणि वाजंत्री,बिजली,आधारस्तंभ’ आदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या.१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वजीर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर अवार्ड मिळाले.विक्रम गोखले यांनी स्वत: दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच ‘आघात’ चित्रपटासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. ‘अनुमती’ या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना २०१३ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तसेच कोल्हापूर इंटरनैशनल फिल्म फेस्टिवल व न्यूयॉर्क इंटरनैशनल फिल्म फेस्टिवलमध्येही त्यांना या चित्रपटातील अभिनयासाठी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
नामांकित निर्मिती संस्थाच्या हिंदी चित्रपटांतही विक्रम गोखले यांनी आपल्या हिंदी शब्दोच्चारांनी
आणि सहजसुंदर,परिपक्व अभिनयाने आपला ठसा उमटविला आहे. ‘इन्साफ,खुदा गवाह,हम दिल दे चुके सनम,हे राम,भुलभुलैय्या,मदहोशी,तुम बिन,चैम्पियन,लाडला,हसते हसते,शाम घनश्याम,
अग्निपथ,ईश्वर,सलीम लंगडे पे मत रो,मिशन ११ जुलै,गफला,धुवां,ये रास्ते है प्यार के’ या अशा अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या.कोणत्याही भूमिकेशी समरस होऊन ताकदीने ती भूमिका जिवंत करण्याचे कसब त्यांच्याकडे आहे.कामावर असलेल्या निष्ठेने आणि समर्पणाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही महत्वपूर्ण भूमिका केल्या.‘ढाई अक्षर प्रेम के,जरा मुस्करा दो’या हिंदी नाटकांशिवाय दूरदर्शन मालिकांमध्येही त्यांचा  सहभाग होता. ‘विरुद्ध’ या मालिकेतील धीरेंद्रराय सिंघानिया या त्यांनी साकारलेल्या भूमिकेची खूप
चर्चा झाली.’जीवनसाथी,संजीवनी,मेरा नाम करेगी रोशन’ या हिंदी मालिका आणि ‘या सुखांनो या’,
‘अग्निहोत्र’ या मराठी मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केलेला आहे.अभिनय क्षेत्रात भारदस्त कामगिरी करतानाही सामाजिक भान आणि खरेपणा जपणाऱ्या या मनस्वी कलाकाराने पब्लिक चैरीटेबल ट्रस्टची स्थापना केलेली आहे.तसेच त्यांना छायाचित्रणाचाही छंद आहे.चित्रपट,नाटक आणि दूरदर्शन मालिकांमध्येही व्यग्र असले तरी एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून त्यांच्याकडे
सभोवतालचे भान आणि चिंतन निश्चित होतं.
नटश्रेष्ठ जयशंकर दानवे म्हणजे माझे पप्पा.त्यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त (२४ ऑगस्ट २००३) आम्ही सिने-नाट्य सृष्टीचे अभिजात कलावंत श्री.विक्रम गोखले यांना आमंत्रण दिले होते.
तेव्हा त्यांनी आपल्या मनोगतात म्हंटले,‘गेली २-३ वर्षे दानवेकाकांच्या स्मृतीला उजाळा मिळणाऱ्या या कार्यक्रमाला हजर राहण्याचा मी खूप प्रयत्न करत होतो.यावर्षी हा योग जुळून आला हे माझं भाग्य आहे.दानवेकाकांची आणि माझी पहिली ओळख १९६४ किंवा १९६५ साली मुंबईला शिवाजी मंदिरात एका तालमीच्या ठिकाणी झाली. ‘रायगड गातो शंभू गाथा’ नावाचं नाटक दानवेकाका दिग्दर्शित करत होते.तोपर्यंत रंगभूमीत व्यावसायिक नट म्हणून माझा जन्मही झाला नव्हता.अनेकवेळा मी दानवेकाकांना भेटलो आहे.त्यांनी माझे काम पाहून वेळोवेळी शाबासकी दिली आहे.असा हा सत्शील कलावंत अन शिस्तप्रिय दिग्दर्शक मी अतिशय नवीन होतो तेव्हा मला लाभला होता.’कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी रंगमंचावर ‘नकळत सारे घडले’ या नाटकातील बटूमामा नेने या
भूमिकेचे स्वगत प्रेक्षकांना ऐकवले.स्वत: न रडताही प्रेक्षकांच्या काळजाला हात घालण्याचे प्रभावी
अभिनयाचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले.संध्याकाळच्यावेळी मारवा,पूरिया व पूरिया धनश्री यांसारखे राग ऐकताना ऐकणाऱ्याच्या मनातील व्याकुळता अश्रूंच्या रूपाने बाहेर येते.नेमके हेच सामर्थ्य विक्रम गोखलेंच्या अभिनयात आहे.जेव्हा त्यांचा अभिनय संपतो तेव्हा रसिक त्या भावसमाधीतून बाहेर येतो
व रिलैक्स झालेला असतो.या त्यांच्या अभिनय सामर्थ्याची प्रचिती आम्हाला त्यादिवशी आली. ते म्हणत, ‘आज कला विश्वात,सांस्कृतिक विश्वात,सामाजिक जीवनविश्वात मी जो कोणी आणि जिथे काही आहे तो मी,माझी खरोखरच तितकी योग्यता आहे म्हणून आहे,की भोवतालाने तिथे नेऊन ती ती लेबल्स मला लावली आहेत म्हणून मी तसा आणि त्या तोऱ्यात मिरवतो आहे,याबाबत सर्वंकष विचार मी करतो.खूप भूमिका करून झाल्यात,अजूनही करतोच आहे.मात्र अभिनयाचा हा वसा असाच पुढे जायला हवा.आतापर्यंतच्या अनुभवातून नव्या पिढीला सर्वांगीण स्वरूपाने नाट्य प्रशिक्षण देण्याचे स्कूल मी सध्या चालवतो आहे.’ त्यांनी होताहोईतो नाटकात राहात,साधारण नाटकातल्याही शक्यता चाचपून बघत रंगभूमीशी नातं राखलं.त्यांच्या या इमानाला सलाम करत त्यांच्या  आजवरच्या कामगिरी विषयी आपण रसिकांनी कृतज्ञ राहिलं पाहिजे हीच त्यांना मानाची श्रद्धांजली !

(नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘अभिनयांकित’ पुस्तकातील जयश्री दानवेंचा हा लेख )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments