शहरातील सांडपाण्याचा निपटारा होण्याकरिता भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा – श्री.राजेश क्षीरसागर
पंचगंगा नदी, रंकाळ्यासह इतर जलसाठ्यांची प्रदूषण मुक्ती आणि शहरातील गंभीर ड्रेनेज लाईनच्या प्रश्नाबाबत महापालिका अधिकाऱ्यांना सूचना
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेजची समस्या निर्माण झालेली आहे. शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नसल्याने प्रामुख्याने शहरातील ई वॉर्ड, उपनगरे आदी परिसरातील सांडपाणी ओपन गटारीमधून नाल्यात मिसळत आहे. याचा दुष्परिणाम पंचगंगा नदी सह रंकाळा व शहरातील इतर प्रमुख तलावांच्या पाण्यावर होवून प्रदुषणात वाढ होत आहे. याकरिता शहरात भुयारी गटर योजना अस्तित्वात आणून शहरातील १०० % सांडपाण्यावर मलनिस्सारण प्रकिया करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ तयार करून शासनाकडे सादर करावा. याचा शासन दरबारी पाठपुरावा करून निधी मंजुरीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. पंचगंगा नदी, रंकाळ्यासह इतर तलावांची प्रदूषण मुक्ती आणि शहरातील गंभीर ड्रेनेज लाईनच्या प्रश्नाबाबत शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित बैठकीत त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शहरातील बहुतांश ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे निर्माण होणारे सांडपाणी ओपन गटारीमधून नाल्यात आणि तलावात मिसळून प्रदुषणात वाढ होत आहे. अशा सांडपाणी मिश्रित सांडपाण्यामुळे रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यासह जलचरांच्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तात्काळ उपाययोजना म्हणून कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील ड्रेनेज लाईनचा प्रभाग निहाय आढावा घेवून १०० % सांडपाण्यावर मलनिस्सारण प्रकिया करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रस्ताव तयार करून अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशा सूचना केल्या.ते पुढे म्हणाले कि, शहरात ऐतिहासिक रंकाळा तलावासह कोटीतीर्थ, राजाराम, लक्षतीर्थ अशा तलावांसह अनेक खणींच्या माध्यमातून जलसमृद्धी अस्तित्वात आहे. या जलसाठ्यांच्या आजूबाजूचा परिसर विकसित होताना या परिसरातील सांडपाणी या जलसाठ्यात मिसळून या तलावांचे आणि खणींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या जलसाठ्यांच्या पाण्याची गुणवत्ता सुधारून तलाव आणि खणींना मूळ स्वरूप प्राप्त करून देणे गरजेचे आहे. यामुळे पाण्याचे प्रदूषण थांबून जलसाठ्यांचे आणि त्यात अस्तितवात असणाऱ्या जलचरांचे संवर्धन करणे शक्य होणार आहे. यासह याचा फायदा पर्यटनवाढीसाठीही होणार आहे. रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी रु.१३ कोटींचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक मान्यतेसाठी सादर केला आहे. त्यापद्धतीने इतर जलसाठांच्या संवर्धनासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा. रंकाळ्यासह इतर जलसाठांच्या संवर्धनाचे प्रस्ताव लवकरात लवकर निधी मंजुरीसाठी शासनाकडे सादर होण्याकरिता प्रशासनाने वारंवार पाठपुरावा करावा. शहरातील १०० % सांडपाण्यावर मलनिस्सारण प्रकिया करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव आणि रंकाळ्यासह इतर जलसाठांच्या संवर्धनाचे प्रस्ताव यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेवून नगरविकास विभागाकडून निधी मंजुरी साठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
सदर बैठकीस कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पाणीपुरवठा विभागाचे आर.के.पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, रियाज बागवान आदी उपस्थित होते.