आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी बंद पाडले कागलमधील बेकायदा लॉजिस्टिक पार्कचे बांधकाम
या पार्कमुळे कागलच्या पिण्याच्या स्वच्छ पाणीपुरवठ्यावर होणार दुष्परिणाम
आमदार श्री. मुश्रीफ यांचा सवाल, जमीन खोदून हजारो झाडे तोडली तरी फॉरेस्टवाले झोपलेत काय?
कोल्हापूर जिल्हा न्यायालयात जाऊ, उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल करणार
कागल/प्रतिनिधी : कागलमध्ये लॉजिस्टिक पार्कच्या नावाखाली सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी बंद पाडले. कागल-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर श्री. लक्ष्मीदेवी मंदिराच्या पाठीमागील बाजूस उंच डोंगरावर हे काम सुरू होते. नगरपालिकेच्यावतीने दोन नोटीसा देऊनही ही कंपनी ऐकत नव्हती. बेकायदेशीररित्या वन विभागाची जमीन खोदून हजारो झाडांची कत्तल केली. तरीही फॉरेस्टवाले झोपलेत काय? असा संतप्त सवाल आमदार श्री. मुश्रीफ यांनी विचारला. याबाबत अधिक माहिती अशी, ही जागा कागल -हातकणंगले पंचतारांकित एमआयडीसीत असल्याचे सांगत कंपनीने भल्या मोठ्या लोखंडी फॅब्रिकेशनचे बांधकाम सुरू केले आहे. कागल नगरपालिका या जागेची प्लॅनिंग ॲथॉरिटी असल्यामुळे बांधकाम परवाना देण्याचा अधिकार नगरपालिकेचा आहे. बांधकामासाठी परवानगी ही न घेतल्यामुळे आतापर्यंत दोन लेखी नोटीसा दिल्या आहेत. तरीही काम सुरूच होते. शेवटी आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी हे काम आज बंद पडले.
“उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार….”
आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, लॉजिस्टिक पार्कच्या नावाखाली येथे भले मोठे गोडाऊनचे बांधकाम सुरू आहे. येथून सांडपाणी कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलावात येऊन संपूर्ण कागल शहराचे पिण्याचे पाणीही दूषित होणार आहे. ही जागा पंचतारांकित एमआयडीसीची असूच शकत नाही. कोणतीही परवानगी न घेता हे मोठे बांधकाम सुरू आहे. फॉरेस्टवाले साधी पिण्याच्या पाण्याची पाईप घातली तरी अडवतात. इथे मात्र रस्त्यासाठी जमीन खोदून हजारो झाडे तोडली तरीही ते झोपलेत काय? असा सवालही श्री. मुश्रीफ यांनी केला. याबाबत सखोल चौकशी झालीच पाहिजे. या बांधकामाविरोधात कोल्हापूर जिल्हा न्यायालयात तर जाऊच. उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल करणार आहोत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी केडीसीसी बँकेची संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नगरपालिका पक्षप्रतोद नितीन दिंडे, नगरसेवक प्रवीण काळबर, नगरसेवक संजय ठाणेकर, इरफान मुजावर आदी उपस्थित होते