चौथ्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईची ची ओमकार रुपीनी अलंकार रुपात पूजा,उद्या त्र्यंबोली यात्रेस कडक पोलीस बंदोबस्त असणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : अश्र्विन शुद्ध चतुर्थी शारदीय नवरात्रौत्सवाचा आज मंगळवार चौथा दिवस आज चौथ्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई ची अलंकार ओमकार रुपीनी पूजा साकारली आहे ती सनत् कुमारांनी गायलेल्या सहस्त्रनाम स्तोत्राचे श्रवण करणाऱ्या आदिशक्ती च्या रुपात.
करवीर माहात्म्य हे क्षेत्राच स्थल पुराण. अल्प अशा मानवी आयुष्यात सर्व क्षेत्रांच्या दर्शनाचे फल प्राप्त होईल असं एखादं क्षेत्र आहे का असा प्रश्र्न सर्व ऋषींनी सूत महर्षींना विचारताच त्यांनी नारद मार्कंडेय संवादातल करवीर माहात्म्य सांगायला सुरुवात केली. या माहात्म्याची मध्यवर्ती पात्रं आहेत ती महर्षी अगस्ती आणि माता लोपामुद्रा. हे अगस्ती ऋषी जेव्हा आई महालक्ष्मी अर्थात अंबाबाई समोर आले तेव्हा त्यांनी षोडषोपचारे पूजन करून पूर्वी सनत्कुमारांनी योगी जनांना सांगितलेलं सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करून देवीचे अर्चन केले. हे सहस्त्रनाम स्तोत्र करवीर माहात्म्य ग्रंथांत २५व्या अध्यायात दिले आहे.
आजची पूजा याच सनत्कुमार कृत स्तोत्राच्या उपदेशावर आधारीत आहे.
आजच्या पूजेत जगदंबा उत्सवमूर्ती प्रमाणे सजली असून शिव वाहन नंदी आणि विष्णू वाहन गरुड तिचे सर्वदेवमय रूप दाखवतात.आजची पूजा मकरंद मुनींश्वर व मुकुंद मुनींश्वर यांनी बांधली होती.
उद्या ललिता पंचमी निमित्त आई अंबाबाईची पालखी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहनातून देवी त्यांबोलीच्या भेटीला जाणार आहे. याठिकाणी मोजक्याच पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कडक पोलीस बंदोबस्तात कोहळा फोडण्याचा विधी पार पडणार आहे.