जखेवाडी पंचक्रोशीच्या पांढऱ्या पट्ट्यात हरित क्रांती – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
जखेवाडी/प्रतिनिधी : आंबेओहोळ धरणाच्या पाण्यामुळे जखेवाडी पंचक्रोशीच्या पांढऱ्या पट्ट्यात हरितक्रांती होईल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जखेवाडी ता. गडहिंग्लज येथे एक कोटी १० लाखांच्या विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच टी. के. पाटील होते.
भाषणात मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, गेल्या तीस पस्तीस वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात गोरगरीब माणूस कधीच नजरेआड होऊ दिला नाही. ग्रामविकास मंत्री पदाच्या माध्यमातून मिळालेली विकासाची गंगा गावागावात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.
*”आधार जगण्याचा……….”*
निराधार योजनांचे पेन्शन
गोरगरिबांच्या जगण्याचा आधार आहे, असे सांगतानाच मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, या योजनेतील लाभार्थ्यांची मुले २५ वर्षाची झाल्यानंतर अनुदान बंद, ही अट रद्द करण्यासाठी प्रयत्नशील आहे. एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार रुपये करणार तसेच उत्पन्न मर्यादा २० हजारावरून ५० हजार इतकी वाढविणार.माजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर म्हणाले, सरपंच टी. के. पाटील यांनी ग्रामपंचायत इमारतीला निधी कमी पडलेची गोष्ट मंत्री श्री. मुश्रीफ साहेबांच्या निदर्शनास आणून दिली आहे. मुश्रीफसाहेब तो कमी पडणारा निधी तात्काळ देतीलच, कारण त्यांनी जनतेला कधीच कमी पडू दिले नाही आहे.
यावेळी सरपंच टी. के. पाटील, उपसरपंच सौ.सुवर्णा दोरूगुडे, सदस्य वैशाली गिरी, ग्रामसेविका सौ.चौगुले, नेताजी पाटील, भीमराव राजाराम, बंटी पाटील, पांडुरंग पाटील आदी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.स्वागत संदीप पाटील यांनी केले. प्रास्ताविक लोकनियुक्त सरपंच टी. के. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश दास यांनी केले.