कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती कोल्हापूर यांचे तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरमध्ये ऑगस्ट २०१९ मध्ये प्रलयंकारी महापुर आला होता. या पुरामध्ये नागरिकांचे प्रापंचिक व व्यावसायिक असे अतोनात नुकसान झाले. या पुरग्रस्तांना शासनाने काही आर्थिक मदत जाहीर केली होती. त्याप्रमाणे आपल्या कार्यालयाकडून अशा पुरग्रस्तांचे जागेवर पंचनामे करुन नुकसान भरपाईची काही रक्कम रोख स्वरुपात व बाकी रक्कम बँक खातेवर जमा केली होती पण अदयापही काही लोकांना बँक खातेवर रक्कम जमा झालेली नाही याचा खुलासा होने गरजेचे आहे. त्याचबरोबर कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यात किती पूरग्रस्त लोकांचे पंचनामे झालेत त्यापैकी किती लोकाना मंजूर नुकसान भरपाइची रक्कम प्रत्यक्ष पोहोच झाली आहे का अशी विचारणा आज कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने तहसीलदार यांच्याकडे निवेेेदनाद्वारे केली आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाकडून आपणाकडे किती रक्कम जमा झाली आहे त्यापैकी किती शिल्लक आहे, पंचनामे झालेल्या सर्व पुरग्रस्तांची नुकसानीची रक्कम शासनाकडून जमा आहे काय, जमा नसल्यास ती शासनाकडून का जमा झाली नाही याचा आम्हाला खुलासा दयावा अशी मागणी करण्यात आली. कारण महाप्रलयंकारी पुरामुळे लोकांचे जीवनच उध्दवस्थ झाले होते त्याची भरपाई त्यांना मिळालीच पाहिजे.
या नुकसान भरपाई मागणी कामाकरिता काही नागरिक आपल्या कार्यालयात विचारणा करण्यासाठी जात असताना संबंधित कर्मचारी उर्मटपणे उडवाउडवीची उत्तरे देतात आणि आम्हाला विचारु नका तिकडे केबिनमध्ये बसलेत त्यांना विचारा अशी उत्तरे देवून गुंडगिरीची भाषा करतात. ही बाब आपल्या कार्यालयास शोभणारी नाही. एकीकडे जिल्हयाचे प्रमुख, जिल्हयाचे जिल्हाधिकारी स्वत: सहा सहा किलोमीटर पायपीट करत वाड्यावस्त्यावर लोकांच्यापर्यंत पोहचून सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि आपल्या कार्यालयातील साधे क्लार्क कार्यालयात
आलेल्या लोकांच्यावर गुंडगिरी करतात असा हा विरोधाभास कशासाठी. अशा उर्मट
कर्मचाऱ्यांमुळे आपले कार्यालय आणि एकूण महसूल विभाग बदनाम होतोय याची नोंद घेऊन
अशा कर्मचाऱ्यांच्यावर कडक कारवाई करुन आपल्या कार्यालयास शिस्त लावावी अशी मागणी करण्यात आली.
तसेच आपल्या कार्यालयात मिळणारे वेगवेगळे उतारे, डायऱ्या यांच्या नकलेच्या प्रतीची फी किती असते त्याच्या फी च्या किंमतीचे फलक नक्कल मागणी काऊंटर नजीक लोकांना दिसतील अशा पध्दतीने लावावेत. आम्ही आपणाकडे मागणी करतो की, वरील प्रश्नांचा खुलासा आम्हास त्वरीत देऊन प्रलंबित पुरग्रस्तांची नुकसान भरपाई बद्दलची माहिती त्वरीत जाहीर करावी ही मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती, कोल्हापूर यांनी केली आहे.
यावेळी रमेश मोरे,अशोक पोवार, बाबासाहेब देवकर,सुनीलकुमार सरनाईक,सिकंदर मुजावर,तेजस सुतार,प्रकाश देसाई,चंद्रकांत सरनाईक,एस. के.माळी यांच्यासह इतर सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.