४ फेब्रुवारीला सिनेमागृहांमध्ये पहा ‘फास’
मागील बऱ्याच दिवसांपासून ‘फास’ हा चित्रपट प्रेक्षकांपासून सिनेसृष्टीपर्यंत सर्वत्रच चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटातील फास नेमका कोणाचा आहे, या चित्रपटात कशा प्रकारची कथा पहायला मिळणार आहे, हा शेतकऱ्यांनी घेतलेला फास आहे की अन्य कोणी… या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये मिळणार आहेत. अविनाश कोलते यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला आशयघन ‘फास’ ४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. माँ एंटरटेनमेंट प्रस्तुत माहेश्वरी पाटील चाकूरकर निर्मित ‘फास’ची सहनिर्मिती नरेश पाटील, पल्लवी पालकर, दयानंद अवरादे, बसवराज पाटील, अनिल पाटील, वैशाली पद्देवाड यांनी केली आहे. वरवर पाहता हा चित्रपट केवळ शेतकरी आणि त्यांच्या व्यथा मांडणारा असेल असं वाटणं स्वाभाविक आहे, पण लेखिका माहेश्वरी पाटील चाकूरकर यांनी शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून समाजातील विविध घटकांच्या गळ्याशी आवळला गेलेला ‘फास’ या चित्रपटात आपल्या लेखनाद्वारे मांडला आहे. अविनाश कोलते यांनी तो तितक्याच संवेदनशीलतेनं पडद्यावर सादर केला आहे. पोलिस, डॅाक्टर, सरकारी कर्मचारी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या आहेतच. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या फासाची भीती आहे. कोलते यांनी ‘फास’चं कथानक पडद्यावर सादर करताना यांसारख्या विविध पैलूंना स्पर्श करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. शेतकरी का फास लावून घेतो, त्याची कारणं काय, तो इतका हतबल का होतो, त्याच्या पश्चात कुटुंबियांचं काय होतं, त्याच्या मुलांच्या डोळ्यांत कधी स्वप्नं तरळतच नाहीत का, वडीलांनी गळफास घेतल्यावर मन:स्थितीचा कोणी विचार करतो का… अशा सर्व प्रश्नांची उत्तरं ‘फास’ चित्रपटात कोणतेही उपदेशाचे डोस न पाजता परीपूर्ण मनोरंजनाच्या माध्यमातून मिळणार आहेत. फास केवळ जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याच्या गळयाभोवती नसतो, तर शहरातील लोकांच्याही गळ्याभोवती असतोच. याचसाठीच हा चित्रपट ग्रामीण भागातील प्रेक्षकांच्या जोडीला मेट्रो सिटीमधील नागरिकांनीही अवश्य पाहण्याजोगा आहे.
फास’ या चित्रपटाचं आणखी मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील सिनेमहोत्सवांमध्ये या चित्रपटावर कौतुकासोबतच पुरस्कारांचाही वर्षाव झाला आहे. सिनेमहोत्सवांमध्ये येणाऱ्या जाणकार प्रेक्षकांच्या जोडीलाच समीक्षकांनीही ‘फास’ची पाठ थोपटली आहे. आजतागायत या चित्रपटानं १३० पेक्षा अधिक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. कसदार कलावंतांचा दमदार अभिनय हे ‘फास’चं आणखी एक वैशिष्ट्य आहे. राष्ट्रीय पारितोषिकावर आपलं नाव कोरणारा उपेंद्र लिमये हा आघाडीच्या अभिनेत्यानं या चित्रपटासाठी पोलिसी युनिफॅार्म चढवला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या भावभावनांसोबतच त्यांच्या अडचणींचा आलेखही या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. कमलेश सावंतनं शेतकऱ्याच्या मुख्य भूमिकेत लक्षवेधी अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. सयाजी शिंदेंसारख्या मातीतील कलाकारानं साकारलेला डॅाक्टरही पाहण्याजोगा आहे. याखेरीज पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे, नामदेव पाटील, निलेश बडे, ज्ञानेश उंडगवकर, उमेश राजहंस, शरद काकडे, ईश्वर मोरे, पवन वैद्य, विनय जोशी, देवा पांडे, पूजा तायडे, तेजस्विनी, माधुरी भारती आणि श्रृतिका लोंढे या सर्वच कलाकारांनी सुरेख अभिनय करत मुख्य कलाकांना मोलाची साथ दिली आहे. सिनेमॅटोग्राफर रमणी रंजन दास यांची अफलातून सिनेमॅटोग्राफी आणि अपूर्वा मोतीवाले व आशिष म्हात्रे यांनी केलेलं अचूक संकलन या ‘फास’च्या गोष्टीही उजव्या ठराव्या अशाच आहेत. संतोष समुद्रे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. ‘फास’च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्यांनी सजलेला एक आशयघन चित्रपट रसिकांच्या सेवेत हजर झाला आहे.