सईचे कोल्हापुरात जंगी स्वागत विश्वविक्रमासाठी सई कन्याकुमारीकडे रवाना
कोल्हापूर /प्रतिनिधी : काश्मीरवरुन आव्हानात्मक प्रवास करत ठाण्याची सई आशिष पाटील ही दहा वर्षाची सायकलपटू कोल्हापुरात पोहोचली आणि तिचे जंगी शिवराष्ट्र हायकर्स आणि मदत फाउंडेशनमार्फत स्वागत करण्यात आले. कोल्हापूरचे आदरतिथ्य आणि स्वागताने सईला पुढच्या प्रवासासाठी बळ मिळाले.
सेव्ह गर्ल, टिच गर्ल, सेव्ह नेचर…असा पर्यावरणीय संदेश देत प्रदूषण टाळण्याचा संदेश देत ती सायकलवरून प्रवास करत आल्याने सई कोल्हापूरकरांच्या मनात घर करुन गेली. कमी वयात मोठा प्रवास करत आहे हे पाहून अनेक जण भारावून गेले तर अनेकांना आपल्या मुलांना अशा पद्धतीने वेगळी दिशा देण्यासाठी महत्वकांक्षा मिळाली. महालक्ष्मीच्या दर्शनानंतर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते सईचा सत्कार झाला. शाहू महाराज यांनी मनःपूर्वक स्वागत केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आस्थापुर्वक व मायेने चौकशी करुन भविष्यातिल वाटचालिस शुभेच्छा दिल्या. तसेच खासदार युवराज संभाजीराजे, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षिरसागर यांच्या हस्ते सईचा सत्कार झाला. यावेळी मदत फाऊंडेशन व केमिस्ट असोसिएशचे अध्यक्ष मदन पाटील, डॉ. संदीप पाटील, शिवराष्ट्र हायकर्सचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, मोहन खोत, सायकल असोसिएशनचे अरुण सावंत, निलेश साळोखे, साधना साळोखे, विनायक जरांडे, पवन पाटील आदी उपस्थित होते. ताराराणी पुतळा येथे सईला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पुढील दोन हजार किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी ती कन्याकुमारी कडे रवाना झाली. या सायकल मोहिमेत सईचे वडील आशिष पाटील, आई विद्या पाटील, साई पाटील, अक्षय पाटील, सुमित कोटकर, राज भोईर, बाबु भोईर, राजेश पाटील, अक्षय पाटील सहभागी आहेत.