राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वच बाजूंनी अपयशी – भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांची टीका
कोल्हापूर/प्रतिनिधी : नागरिकांच्या हितासाठी सत्तेवर आल्याचा दावा करणार्या महाविकास आघाडी सरकारनं गेल्या २ वर्षांत जनहिताचा एकही निर्णय घेतला नाही. मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. राज्यातील हजारो पुरग्रस्त शासकीय अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळं हे महाविकास आघाडी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलंय, अशी टिका भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी केली. कोल्हापूर दक्षिणच्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज आर. के. नगर इथं घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
भाजपच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आर. के. नगर इथल्या सोसायटीमध्ये आज पार पडला. भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक, तानाजी पाटील, आशिष पाटील, पंचायत समिती सदस्य रमेश चौगले, अनिल शिंदे, कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा संपन्न झाला. यावेळी बोलताना धनंजय महाडिक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. सत्तेवर आल्यापासून महाविकास आघाडी सरकारने एकही जनहाताचा निर्णय घेतलेला नाही. बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी राज्य शासनाकडं कोणतंही धोरण नाही. व्यापारी-उद्योजकांसाठी कोणतीही ठोस योजना नाही. मोफत विजेच्या प्रश्नावरूनही नागरिकांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, तर महापुरातील हजारो बाधित नुकसान भरपाईसाठी देखील राज्य सरकारनं काहीच केेलेलं नाही. मराठा आरक्षणाबाबतही राज्य सरकारनं ठोस भुमिका मांडलेली नाही, तर राज्य सरकारच्या निष्क्रीयतेमुळंच ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळं हे महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप धनंजय महाडिक यांनी केला. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गावपातळीपर्यंत जाऊन आघाडी सरकारचा अपयश जनतेसमोर उघड करावं, असं आवाहनही महाडिक यांनी केलं. निवडणुकांमध्ये जय-पराजय होतच असतात. याचा अर्थ महाडिक संपले, असा होत नाही. सर्वसामान्यांच्या ताकदीवर आणि पाठबळावर नव्या दमानं महाडिकांसह भाजपचे कार्यकर्ते विविध सत्तास्थानं काबिज करतील, असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला. यावेळी तानाजी पाटील, आशिष पाटील, पंचायत समिती सदस्य रमेश चौगले, कृष्णराज महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना दक्षिणच्या कार्यकर्त्यांनी सजग राहून भाजपच्या ध्येयधोरणांचा प्रचार-प्रसार करावा, महाविकास आघाडीच्या अपयशाचे चित्र जनतेसमोर आणावे, असं आवाहन केलं. या मेळाव्याला नामदेव वाईंगडे, नियाज नदाफ, जयराज निंबाळकर, राजू संकपाळ, अनिल पांढरे, सुमित चौगले, शामराव शिंदे, हेमंत पाटील, अर्जुन इंगळे, रंगराव तोरस्कर, संपत पोवार, पांडुरंग खोत, विवेक मंद्रुपकर, अनिरूध्द कोल्हापुरे यांच्यासह दक्षिणचे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.