सिद्धगिरी कोविड हॉस्पिटलचा दुसरा विस्तारित विभाग लोकार्पण सोहळा
कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘निराधारांना आधार’ या तत्वावर काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर सुरु आहे. कोल्हापुरात कोरोना संसर्ग वाढू लागल्यावर बेडची कमतरता प्रकर्षाने जाणवू लागली. बेड न मिळाल्याने कोणास प्राणास मुकावे लागू नये म्हणून अल्पावधीत सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये कोरोना विभाग कार्यरत झाला. एक महिन्याच्या कालावधीत अनेको कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. आरोग्यपूर्ण नैसर्गिक सानिध्य लाभल्यामुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी अल्प दरात विलगीकरण कक्ष हि चालवण्यात येत आहे.
तरी वाढता संसर्ग पाहता रुग्णांसाठी आणखी बेडची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्यामुळे मा.आ.चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्याने सिद्धगिरी हॉस्पिटलचा नवीन दुसरा विभाग सुरु होत आहे. यामध्ये प्रामुख्याने 7 बेड व्हेंटीलेटर सहित,23 ऑक्सिजन बेड व सामान्य 10 बेड असे सुमारे चाळीस बेडचे अद्यावत कोविड रुग्णालय लोकांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे. कोरोना संसार्गानंतरही उद्भवणाऱ्या अनेक आजारांवर उपचार करणारे केंद्र म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटल नावारूपास येईल. अद्यावत उपकरणे, तत्पर वैद्यकीय स्टाफ, कोरोना निदानासाठी एच.आर.सिटी., अद्यवत प्रयोगशाळा एकाच छताखाली सर्व वैद्यकीय सुविधा मिळत असल्यामुळे सिद्धगिरी हॉस्पिटल कोरोनाग्रस्तांसाठी एक आधारवड ठरणार आहे.