२७ सप्टेंबर २०२१ जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रम
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा हा जागतिक पर्यटन क्षेत्रांच्या यादीमध्ये आणण्याच्या उद्देशाने पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वसमावेशक अशा ‘पर्यटन आराखड्याची’ आखणी सुरु केली आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने गड, किल्ले, ऐतिहासिक स्थळे, धार्मिक स्थळे, वारसा स्थळांनी तसेच खाद्यसंस्कृतीने परिपूर्ण जिल्हा- कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पर्यटन वृद्धी च्या दृष्टीने बरीच जागतिक दर्जाची ठिकाणे आहेत. कोल्हापूर जिल्हा हा गड किल्ले पर्यटन, ऐतिहासिक स्थळे, धार्मिक स्थळे, वारसा स्थळे, संग्रहालये, पुरातत्व ठिकाणे, जंगले, वनराई, जैवविविधता, कला, क्रीडा, सांस्कृतिक, उत्सव, शैक्षणिक, जल पर्यटन , ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन, साहसिक पर्यटन, औद्योगिक पर्यटन, हस्तकला, खाद्यसंस्कृती या सर्वानी परिपूर्ण आहे.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या दरम्यान विविध उपक्रम व कार्यक्रम- जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने उपलब्ध खजिना सर्वांसमोर यावा, या दृष्टीने दि. २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन व विविध संस्था यांच्यामार्फत दि. २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कोरोनाच्या संक्रमणाचा विचार करुन या कार्यक्रमांचे नियोजन हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला जाईल. या आठवड्या दरम्यान दि. २६ सप्टेंबर हा कोल्हापूरांकरासाठी महत्वाचा असा दिवस आहे. या दिवशी ३०६ वर्षांपूर्वी करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी अंबाबाई च्या मूर्तीची पुनः प्राणप्रतिष्ठापना झाली होती. जागतिक पर्यटन दिन हा आठवडाभर विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे, ज्याची सुरुवात मान्यवर चित्रकारांची व शिल्पकारांच्या प्रात्यक्षिकाने होईल.
विविध उपक्रम व कार्यक्रम-
करवीर निवासिनी पुनः प्राणप्रतिष्ठापना दिन वर्धापन सोहळा, डेस्टिनेशन कोल्हापूर लोगो चे अनावरण,
जिल्हा पर्यटन वेबसाईट चे अनावरण,
जिल्हा पर्यटन नकाशा चे अनावरण,
निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, व्हिडिओग्राफ स्पर्धा यांचे अनावरण, कोल्हापूर उत्सवांचे वेळापत्रक प्रकाशन,
पर्यटन विकासासंदर्भात ऑनलाईन व्याख्याने, बाईक रॅली, दुर्ग भ्रमंती, जंगल भ्रमंती, ग्राम भ्रमंती, जल पर्यटन, कृषी पर्यटन व साहस पर्यटनाचे कार्यक्रम, स्वच्छता अभियान, हेरिटेज समिती तर्फे व्हीडिओ प्रकाशन, हस्तकला प्रात्यक्षिक, ऑफ रोड रॅली, हेरिटेज वॉक आदी उपक्रम या दरम्यान राबविण्यात येणार आहेत. विविध क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ मान्यवरांचा सहभाग- या उपक्रमामध्ये जिल्हा प्रशासना सोबत क्रेडाई, हॉटेल मालक संघ, हेरिटेज कमिटी, पर्यटन महामंडळ, पुरातत्व विभाग, ट्रॅव्हल एजन्ट असोसिएशन, देवस्थान समिती, हिल रायडर्स अडव्हेंचर फौंडेशन, कोल्हापूर जिल्हा माऊंटनिअरिंग व अलाईड स्पोर्ट्स असोसिएशन , टूर ऑपरेटर्स, निर्मिती ग्राफिक्स तसेच विविध क्षेत्रातील अनेक अनुभवी व तज्ञ मान्यवर व्यक्तींचा या उपक्रमात सहभाग आहे.