खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढविण्यासाठी
आणखीन 13 आरोग्य निरिक्षकांची नियुक्ती
– आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी
कोल्हापूर /प्रतिनिधी : शहरातील उर्वरित खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढविण्यासाठी आणखीन 13 आरोग्य निरिक्षकांची नियुक्ती केली असून या आरोग्य निरिक्षकांनी आपापल्या वॉर्डामधील खासगी हॉस्पिटलमध्ये अधिकाधिक बेड वाढविण्याची सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज केली.
शहरातील उर्वरित खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढविण्यासाठी तसेच कोव्हिड केअर सेंटर आणि अलगीकरण कक्षामधील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उपायुक्त विनायक औंधकर, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार तसेच शहरातील सर्व आरोग्य निरिक्षक उपस्थित होते.
शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढविण्यासाठी यापूर्वी महानगरपालिकेने विशेष अधिकाऱ्यांची यापूर्वीच नियुक्ती केली असून उर्वरित हॉस्पिटलध्येही बेड वाढविण्यासाठी 13 आरोग्य निरिक्षकांची अतिरिक्त स्वरुपात नियुक्ती केली आहे. शहरातील सर्वच खासगी हॉस्पिटलनी त्यांच्याकडील बेड उपलब्धतेबाबतची दैनंदिन माहिती शासनाने तयार केलेल्या ॲपवर तात्काळ अपलोड करावी, यासाठीही आरोग्य निरिक्षकांनी लक्ष देण्याची सूचनाही आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली.
याबरोबरच आरोग्य निरिक्षकांनी आपापल्या वॉर्डातील कोव्हिड केअर सेंटर आणि अलगीकरण कक्षामधील आरोग्य सुविधेबाबत अधिक दक्षता घ्यावी, तसेच आरोग्य निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही काम करतांना कोरोनाच्या अनुषंगाने आपलीही काळजी घेण्याची सूचनाही आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली.