जबरी चोरी करणाऱ्या एकाला ३ लाख २० हजारच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी घेतले ताब्यात
कोल्हापूर/प्रतिनिधी : राजारामपूरी पोलीस आणि करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करणाऱ्या एकाला आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. संशयित सचिन गवळी (वय ३३ वर्ष) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून सुमारे ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पट्टणकोडोली मधील शुभम चव्हाण हा ११ मे रोजी मैत्रिणी सोबत आर. के. नगर परिसरात उभे होते, यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना धमकावून दुचाकी आणि एक मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणी राजारामपूरी पोलीसांत गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सुभाषनगर येथे राहणाऱ्या सचिन दत्तात्रय गवळी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने दुचाकीसह मोबाईल आपण एका मित्राच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. तसेच दोन दिवसांपूर्वी जरगनगर इथे घरफोडी केल्याचीही कबुली त्याने दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक चोरीची दुचाकी, मोबाईल आणि जरगनगर येथून चोरी केलेले सोन्याचे दागिने असा सुमारे ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, असिफ कलायगार, विनोद कांबळे, अनिल जाधव यांनी केली.