राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

कोल्हापूर मंडळात ६,५९२ बूथवर ६.२२ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोस

कोल्हापूर, दि. २७ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील मोहिमेचा शुभारंभ रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे होणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.भारताला मार्च २०१४ मध्ये पोलिओमुक्त देशाचा दर्जा मिळाला असला, तरी शेजारील काही देशांमध्ये पोलिओचा प्रसार सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात १९९५ पासून ही मोहीम सुरू असून, कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ५९ फेऱ्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत. जिल्ह्यातील शेवटचा पोलिओ रुग्ण २३ ऑगस्ट १९९९ रोजी शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी येथे आढळला होता.                                                     यंदा कोल्हापूर मंडळात ६,५९२ लसीकरण बूथवर ६ लाख २२ हजार ८९७ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात येणार आहे. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात २,०८९ बूथवर २ लाख ८६ हजार ९१७ बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. दि. २९ जूनपासून घरभेटीद्वारे लसीकरणासाठी जिल्ह्यात २,५७२ पथके कार्यरत राहणार आहेत.याच कार्यक्रमात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील २९१ लाभार्थी बालकांना श्रवणयंत्रे, व्हीलचेअर, वॉकर, कुबड्या, कमोड, रोलेटर वॉकर आदी सहाय्यभूत साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. सन २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील ५,००८ बालकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *