कोल्हापूर/प्रतिनिधी : सद्य परिस्थितीमध्ये भारत जात, धर्म, वर्ग, वर्ण यामध्ये विभागला गेला आहे माणूस देखील कप्पे बंद झाला आहे. संस्कृतीच्या नावाखाली माणसं दुरावली जातील यासाठी धार्मिक राजकारण उभे केले जात आहे अशा काळात साहित्यिकांनी भूमिका घेत मानवतावादी विचारांची प्रेरणी करणे गरजेचे आहे. माणूस जगला तर देश जगेल. देश महासत्ता बनायचा असेल तर माणूस समृद्ध झाला पाहिजे. माणसाच्या विकासाची नवी परिभाषा निर्माण केली पाहिजे. धर्मांध राजकारण झुगारून मानवतावादी संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे. मानवतावादी साहित्य संमेलन माणसाला माणूस बनवण्याची प्रक्रिया पार पाडेल असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, दिग्दर्शक आणि निर्माते आणि संमेलनाध्यक्ष अॅड. डॉ. रमेश विवेकी यांनी प्रतिपादन केले.
ते लोकराजे राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत मानवतावाद जोपासण्याच्या दृष्टिकोनातून मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलनात बोलत होते.
यावेळी कोल्हापूरचे ज्येष्ठ मानवतावादी साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे आणि नाशिकचे भारतीय संविधानाचे अभ्यासक, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रा अँड गोव्याचे मा. चेअरमन अॅड. जयंत जायभावे यांना अॅड. विवेक घाटगे यांच्या हस्ते ‘मानवतावादी’ जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.अॅड. जयंत जायभावे म्हणाले, संविधानाने सर्वांना समान अधिकार दिला असून लोकशाहीमध्ये अल्प असणारा विरोधी पक्षाला सन्मान देण्याची भूमिका अधोरेखित केली असताना सध्याच्या बहुमत असणारे लोक हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहेत. लोकशाही मोडीत काढून हुकूमशाहीकडे वाटचाल देशासाठी व संविधानासाठी घातक आहे. त्यामुळे मानवतावादी लोकांनी एकत्र येऊन याचा प्रतिरोध करणे गरजेचे आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, माणसांनी माणसांशी माणसाप्रमाणे वागावे. यासाठी मानवतावादी विचारांचा जागर होणे गरजेचे आहे. सत्यासोबत उभे राहणे माणसाला मानवीमूल्य प्राप्त करून देणे, त्याच्या अभिव्यक्तीला अबाधित ठेवण्यासाठीची भूमिका साहित्यिक विचारवंतांनी घेतली पाहिजे. मानवतावाद मानवी विकासाला मदत करणारा आशावाद आहे.
स्वागताध्यक्ष डॉ. राजेखान शानेदिवाण, संस्थापक अध्यक्ष अनिल म्हमाने, डॉ. मिलिंद आवाड, अॅड. विवेक घाटगे, डॉ. शोभा चाळके, निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर, भरत लाटकर यांनी मनोगते व्यक्त केली. तत्पूर्वी मानवतावादी गाणं म्हणून शाहीर शीतल साठे व शाहीर सचिन माळी संमेलनाच उद्घाटन केले.
आदित्य म्हमाने आणि दूर्वा राजहंस लिखित आम्हाला जगायचे आहे! या बाल लेखकाच्या पुस्तकावर विशेष चर्चा करण्यात आली. भविष्यातील मुलं जगायची आहेत म्हणतात हा आशावाद येणाऱ्या पिढीसाठी खूपच खूपच सुखद आहे अशी प्रतिक्रिया संमेलनातील विविध मान्यवरांनी अधोरेखित केली. संमेलनात आम्हाला जगायचे आहे! या पुस्तकाच्या पंचवीस हजार प्रतींची वाचकांनी विक्रमी खरेदी केली.
दुपारच्या सत्रात मानवतावाद या विषयावर डॉ. कपिल राजहंस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात अॅड. कृष्णा पाटील, अॅड. करुणा विमल, प्राचार्य सुरेश कांबळे यांनी मानवतावादावर भाष्य केले. कवी व पत्रकार ताज मुल्लाणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवी संमेलनास डॉ. किरण भिंगारदिवे, डॉ. वसंत भागवत, तानाजीराव जाधव, डॉ. सागर भजनावळे यांच्यासह शंभरहून अधिक कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
व्यंकाप्पा भोसले, भरत लाटकर, लालासाहेब नाईक, सुरेश केसरकर, कृष्णात पाटील, मधुकर शिर्के, प्रमोद कांबळे, सुनील जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागातून मोठ्या संख्येने साहित्यिक आणि विचारवंत उपस्थित होते.
मानवतावादी संमेलनात एकाच वेळी मानवतावादी ऐशी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर, अर्हंत मिणचेकर, गंगाधर म्हमाने, सिद्धार्थ तामगावे, निवेदक अभिजीत मासुर्लीकर, बालनिमंत्रक आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर, दुर्वा राजहंस यांनी संमेलनाचे आयोजन होते.

