एनआयटी’ ला ‘नेशन्स प्राईड’ राष्ट्रीय पुरस्कार

एनआयटी’ ला ‘नेशन्स प्राईड’ राष्ट्रीय पुरस्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी : विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट ठेवून लष्कर, शिक्षण, न्याय क्षेत्रातील दिग्गजांनी स्थापन केलेल्या ‘व्हेटरन्स इंडिया’ या संस्थेने शिक्षणेतर उपक्रमांतून राष्ट्रवाद, देशभक्ती व राष्ट्रनिर्माण यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शैक्षणिक संस्थांना दिला जाणारा ‘नेशन्स प्राईड’ हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) काॅलेजला प्राप्त झाला. नवी दिल्ली येथे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या ‘विजय दिवस मानवंदना’ या कार्यक्रमात हे पुरस्कार वितरण झाले. एनआयटीतर्फे संचालक डाॅ. संजय दाभोळे व विभागप्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला.
भारतीय वायुसेनचे निवृत्त अधिकारी डाॅ. बिनयकुमार मिश्रा यांनी स्थापन केलेली व्हेटरन्स इंडिया ही अराजकीय संस्था आहे. सेना पदक व विशिष्ट सेवा पदक विजेते मेजर जनरल (निवृत्त) गगन दीप बक्षी, एआयसीटीईचे माजी चेअरमन आणि नॅक व एनबीएचे विद्यमान चेअरमन डाॅ. अनिल सहस्त्रबुद्धे, एआयसीटीईचे विद्यमान चेअरमन डाॅ. टी. सीतारामन, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अध्यक्ष प्रा. विनयकुमार पाठक, ऑलिंपिक पदक विजेते व अर्जुन पुरस्कार सन्मानित हाॅकी खेळाडू अशोक ध्यानचंद, इज्युकेशन प्रमोशन सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डाॅ. एम. आर. जयराम, केरळ उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश पी. एन. रविंद्रन, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थेचे अधिष्ठाता डाॅ. सुनिल पारीक, सामाजिक कार्यकर्ते रोशनकुमार सिंह हे दिग्गज या संस्थेचे आश्रयदाते व पुरस्कर्ते आहेत. भारतीय नागरिकांमध्ये देशभक्ती व राष्ट्रवाद वृद्धिंगत व्हावा आणि नागरिकांनी विकसित भारत २०४७ व आपत्ती व्यवस्थापनात योगदान द्यावे यासाठी ही संस्था कार्यरत आहे. संस्थेने यासाठी विशेषकरून उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांची ‘व्हाॅलेंटिअर पॅट्रिऑटिक रिझर्व फोर्स’ सदस्य म्हणून नोंदणी सुरू केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना यापुढे विविध प्रशिक्षण दिले जातील, नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्स व स्टार्टअप संकल्पना यांना प्रोत्साहन दिले जाईल.
एनआयटी संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी सदर पुरस्कार श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूरचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांना सुपूर्द केला. डाॅ. के. जी. पाटील यांनी सर्व स्टाफ व विद्यार्थी यांचे अभिनंदन करत हा अभिमानाचा क्षण असल्याचे प्रतिपादन केले. या नोंदणीसाठी विशेष परिश्रम घेतलेले कर्मचारी रंगराव उर्फ राहूल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अधिष्ठाता प्रा. बाजीराव राजिगरे, शैक्षणिक समन्वयक प्रा. प्रविण जाधव, प्रशासकीय अधिकारी संदीप पंडे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *