राष्ट्र सेविका समितीचे संचलन उत्साहात संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्र सेविका समितीचे , विजयादशमी च्या निमित्ताने आयोजित केलेले स-घोष पथ संचलन आज सकाळी उत्साहात संपन्न झाले. या संचलनात कोल्हापूर शहर व उत्तर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी , हूपरी , पन्हाळा आदि गावांतून , १५० हून अधिक सेविका पूर्ण गणवेशात सहभागी झाल्या होत्या.
या संचलनाचा प्रारंभ प्रायव्हेट हायस्कूल येथे झाला. मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर , महाद्वार रोड , जोतिबा रोड , बिंदू चौक या शहरातील प्रमुख नागरी व व्यापारी भागातून मार्गक्रमण करत संचलनाची प्रायव्हेट हायस्कूल येथे सांगता झाली.संचलनाच्या मार्गावर नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने रांगोळया काढून , फटाके वाजवून व भगव्या ध्वजावर पूष्पवृष्टी करून संचलनाचे स्वागत करण्यात आले.
राष्ट्रसेविका समिती ही अखिल भारतीय स्तरावर काम करणारी संघटना असून यंदा ९० व्या वर्षात पदार्पण करत आहे . वंदनीय लक्ष्मीबाई तथा मावशी केळकर यांनी १९३६ साली सुरु केलेल्या या संघटनेचा आज सर्व भारतात शाखा विस्तार झाला आहे. महिलांनी शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावे व संघटित होऊन ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराने सक्रिय व्हावे , या उदात्त हेतू ने समिती काम करते.
आजच्या संचलनानंतर प्रायव्हेट हायस्कूल मध्ये समितीचा विजयादशमी चा उत्सव संपन्न झाला. या उत्सवासाठी जमलेल्या सेविका व उपस्थित नागरिकांना प्रमुख वक्त्या डाॅ. जूई कुलकर्णी यांनी ‘ संघ विचार हाच राष्ट्र विचार ‘ या विषयावर संबोधित करताना, संघाची कार्यपद्धती , व्यक्ती निर्माण , सशक्त संघटन व राष्ट्रहीताची जोपासना या मुद्द्यांचे उद्बोधक विवेचन केले.
यावेळी बोलताना त्यांनी कुटुंब प्रबोधन, पर्यावरण रक्षण, सामाजिक समरसता , स्व -बोध व नागरी कर्तव्ये या पंचपरिवर्तनाची आवश्यकता विषद केली .उत्सवाचे प्रमुख पाहुणे , माजी नगरसेवक श्री अजित ठाणेकर यांनी संघविचाराने प्रेरित होऊन उपस्थित माता-भगिनींनी आपापल्या ठिकाणी सक्रिय कार्यरत राहून राष्ट्रहीताचे काम करावे असे आवाहन केले.
या संचलन व दसरा उत्सवासाठी समितीच्या प्रांत बौद्धिक प्रमुख सौ. मैत्रेयी शिरोळकर विशेष उपस्थित होत्या.
या संचलन व दसरा उत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजनात , उत्तर कोल्हापूर जिल्हा कार्यवाह सौ गौरी मुजुमदार, दक्षिण कोल्हापूर जिल्हा कार्यवाह सौ अनघा नाईक , शहर कार्यवाहीका सौ प्रज्ञा परांजपे , यांच्यासह सौ चिन्मयी कोटी , सौ देवयानी पलूस्कर, सौ प्राची जोशी , सौ सविता चरपल्ले, सानिका लाड , ऋतुजा दोरकर आदि सेविकांचा सहभाग होता.