नांदणी येथील माधुरी महादेवी हत्ती आता पुन्हा आपल्या स्वगृही म्हणजेच नांदणीला परतणार
वनताराच्या इंस्टा पेज वरती वनतारा संस्थेकडून मागितली गेली माफी
वनतारा टीमकडून माधुरीसाठी उभारले जाणार पुनर्वसन केंद्र
कोल्हापूर/प्रतिनिधी : नांदणी येथील माधुरी महादेवी हत्ती आता पुन्हा आपल्या स्वगृही म्हणजेच नांदणीला परतणार आहे तसे वनतारा टीमने सांगितले असून नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वनतारा संस्थेने इन्स्टा पेजवर याबाबत सांगितले असल्याचे समजले आहे.
याबाबत वनतारा संस्थेने असे म्हटले आहे की वनतारा संस्था कोल्हापूर येथील जैन मठ आणि येथील जनतेसाठी ‘माधुरी’ हत्तीणीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व पूर्णपणे समजून घेते आणि त्याचा मनापासून सन्मान करते. अनेक दशकांपासून माधुरी जैन मठाच्या अध्यात्मिक परंपरेचा व समुदायाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग राहिलेली आहे. माधुरीच्या उपस्थितीबाबत भक्तजन, जैन मठाचे नेतृत्व आणि व्यापक समुदायाने व्यक्त केलेल्या भावना आम्ही पूर्णपणे मान्य करतो आणि आदरपूर्वक स्वीकृती देतो.
माधुरीच्या स्थलांतराच्या संदर्भात वनताराची भूमिका केवळ आणि केवळ माननीय सर्वोच्च न्यायालय व माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीत मर्यादित होती. माधुरीच्या स्थलांतराचा निर्णय न्यायालयीन आदेशांनुसार घेतला गेला, आणि वनताराची जबाबदारी होती फक्त तिची योग्य वैद्यकीय काळजी घेणे, उपचार देणे आणि तिला सुरक्षित व स्वतंत्र रेस्क्यू आणि पुनर्वसन केंद्रात निवारा देणे. वनताराने कधीही या स्थलांतराची शिफारस केलेली नाही, आणि धार्मिक भावना अथवा परंपरेत हस्तक्षेप करण्याचा कोणताही हेतू आमचा नव्हता.
कायदेशीर प्रक्रिया, जबाबदार प्राणी काळजी आणि समुदायासोबत समन्वय यासाठी वचनबद्ध राहून, जर जैनमठ व महाराष्ट्र शासन माधुरीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी माननीय न्यायालयात अर्ज दाखल करत असतील, तर वनतारा संपूर्ण सहकार्य देण्यास तयार आहे. माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार, माधुरीच्या सुरक्षित व सन्मानपूर्वक पुनरागमनासाठी आवश्यक तांत्रिक व वैद्यकीय मदत वनताराकडून दिली जाईल.
तसेच, वनतारा पुढील प्रस्ताव सादर करत आहे:माधुरीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी परिसरात एक उप-केंद्र (सॅटेलाइट रिहॅब सेंटर) स्थापन करण्यासाठी जैन मठ व राज्य सरकारसोबत समन्वय साधून काम करण्याची आम्ही तयारी दर्शवत आहोत. हे केंद्र पशू कल्याण मार्गदर्शक तत्वांनुसार, उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या सल्ल्याने, आणि मठाच्या संमतीने, आंतरराष्ट्रीय निकषांनुसार उभारले जाईल.
*या प्रस्तावित केंद्रात हे समाविष्ट असेल:*
• सांधेदुखी व स्नायूंच्या आरामासाठी विशेष हायड्रोथेरपी तलाव
• नैसर्गिक हालचालीसाठी मोठे जलसाठा (स्विमिंग व वावरासाठी)
• फिजिओथेरपीसाठी लेझर उपचार कक्ष
• रात्रीसाठी सुरक्षित, झाकलेले निवासस्थान
• बेड्या न वापरता मोकळ्या व हिरवळीच्या जागेत मुक्त संचार
• नैसर्गिक सवयी वाढविण्यासाठी व पर्यावरणीय समृद्धीसाठी वाळूचा खड्डा
• २४x७ वैद्यकीय देखरेखीसाठी संपूर्ण सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना
• विश्रांतीसाठी रबरयुक्त जमिनीवर आधारित प्लॅटफॉर्म
• सांधेदुखी, पायांवरील संसर्ग आणि थकवा कमी करण्यासाठी मऊ वाळूचे उतारयुक्त ढिगारे
या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन जैन मठ व महाराष्ट्र शासन यांच्या सल्ल्यानुसार ठरवली जाईल. आवश्यक परवानग्या व अनुदान मिळताच वंतराची तज्ज्ञ टीम तत्काळ अंमलबजावणीस सज्ज आहे.या प्रस्तावामागील उद्दिष्ट फक्त माननीय न्यायालयाच्या संभाव्य आदेशांची पूर्तता करणे व माधुरीच्या भावी कल्याणासाठी उपाय सुचवणे हेच आहे. या प्रस्तावावर वंतराचा श्रेय घेण्याचा कोणताही हेतू नाही. तसेच, हा केवळ एक प्रस्ताव आहे — बंधनकारक अट किंवा अटळ अटी नाहीत. जैन मठ कोणताही पर्यायी प्रस्ताव मांडल्यास, आम्ही त्याचा संपूर्ण आदर करू आणि न्यायालयाच्या अंतिम निर्णयानुसार काम करू.
जर न्यायालयाच्या आदेशाच्या पालनाच्या प्रक्रियेत, आमच्या कोणत्याही कृतीमुळे जैन समुदाय किंवा कोल्हापूरच्या जनतेच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही मन:पूर्वक खेद व्यक्त करतो.
विचार, वाणी किंवा कृतीने, जाणूनबुजून किंवा अनवधानाने जर कुणाचे मन दुखावले असेल, तर आम्ही क्षमायाचना करतो.
वनतारा संस्था भारतभरात प्राणी कल्याण, संस्थात्मक प्रामाणिकता आणि समुदायाशी सुसंवाद यासाठी कटिबद्ध आहे. कायद्याचे पालन, पारदर्शकता आणि आमच्या ताब्यातील प्राण्यांचे कल्याण हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील.
चला, माधुरीवरील प्रेमाच्या आधारावर, संघर्ष न करता एकत्र येऊया.
आदरपूर्वक,
टीम वनतारा.