Saturday, July 26, 2025
spot_img
Homeताज्याकोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध कोल्हापुरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना खासदार डॉ....

कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध कोल्हापुरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही

कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध कोल्हापुरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही

कोल्हापुरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाकडे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारीक लक्ष आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुती सरकारने कोल्हापूरच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला. यापुढेही कोल्हापूरला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करु, अशी ग्वाही शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. शिवसेना पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते शनिवारी झाले. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोक माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार जयश्री जाधव आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, कोल्हापूरकरांनी शिवसेनेला भरभरुन प्रेम केले. इथल्या मतदारांनी महायुतीच्या १० पैकी १० जागा निवडून दिल्या. यात शिवसेनेचे पाच आमदार निवडून आले. या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडवता येतील. जिल्ह्यात मध्यवर्ती कार्यालय असावे अशी बऱ्याच वर्षांपासून कार्यकर्त्यांची मागणी होती. आज मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून ती पूर्ण झाली, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे साहेबांनी अडीच वर्ष राज्याचे नेतृत्व करताना महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांच्यासाठी अनेक निर्णय घेतले. लाडकी बहिण योजना आणली. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे निर्णय घेतले. अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून फिरणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा या महाराष्ट्राने पाहिला. या कामामुळेच सर्वसामान्यांचा विश्वास शिंदे साहेबांवर आणि शिवसेनेवर बसला, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. जेष्ठ नागरिकांना एसटीमध्ये मोफत प्रवासाची सवलत योजना लागू केली. सुरुवातीला या योजनेची खिल्ली उडवली गेली, मात्र या योजनेचा लाखो ज्येष्ठांनी लाभ घेतला. याबाबत पन्हाळा ते पावनखिंड या मोहीमे दरम्यान आपल्याला अनुभव आल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. या मोहीमेच्या वाटेवर एक ज्येष्ठ नागरिक वाट पाहत होते. ते मला भेटले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देण्याची भावना व्यक्त केली. तळागाळातील लोकांसाठी शिंदे साहेबांनी केलेल्या कामाचा आपल्याला अनुभव येतो, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. काहीजण सकाळ संध्याकाळ टोमणे मारण्याचे, शिव्या देण्याचे काम करतात, पण त्यांना मतदारांनी घरी बसवले असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी उबाठाला लगावला.
जिल्ह्यात पाऊस असून देखील मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित आहेत. शिवसेना हा विचार आहे. तो पुढे घेऊन जात असताना तो ऊन वारा पाऊस कशाचीही तमा बाळगत नाही हे आज पुन्हा एकदा दिसून आले, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक ही मोहीम सुरु आहे. त्यासाठी सदस्य नोंदणी सुरु करा. लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काम करायचे आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभ राहायचं आहे. जिल्ह्यात महायुतीचा भगवा नक्कीच फडकेल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments