हिल रायडर्सची ७२ वी पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम शिवमय वातावरणात यशस्वी
कोल्हापूर/प्रतिनिधी : हिल रायडर्स संस्थेची ७२ वी ऐतिहासिक पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मार्गावरून अत्यंत उत्साहात आणि शिवमय वातावरणात नुकतीच पार पडली. या मोहिमेत महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील ५७० हून अधिक मोहीमवीर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शनिवारी पन्हाळगडावरून सुरू झालेली ही ५२ किलोमीटरची पदभ्रमंती मोहीम दगड-धोंडे, चिखल, घनदाट जंगल, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा सामना करत रविवारी पावनखिंडीत यशस्वीरित्या पोहोचली. ऐतिहासिक मार्गावरील अनेक वाड्या-वस्त्या पार करत मोहीमवीरांनी शिवकालीन इतिहासाची अनुभूती घेतली.
सर्वात लहान व सर्वात मोठ्या मोहिम विरास कै. सुरज ढोली व कै. युवराज साळोखे यांच्या स्मरनार्थ सन्मान चिन्ह देण्यात आले
पावनखिंड येथे पोहोचल्यानंतर स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या नरवीर मावळ्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी (BDO) सोनाली माडकर, चंदगडचे BDO, पन्हाळा येथील तहसीलदार इंगळे आणि एव्हरेस्टवीर भगवान चवले यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी निसर्ग अभ्यासक प्रमोद माळी यांनी खिंडीचा प्रेरणादायी इतिहास कथन केला. हे इतिहास कथन ऐकताना उपस्थित पाहुणे आणि मोहीमवीरांच्या डोळ्यात पाणी तरळले. मोहीमवीरांनी केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘नरवीर मावळे अमर रहे’ या घोषणांनी पावनखिंडीचा परिसर दणाणून गेला.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी हिल रायडर्सचे सर्व शिलेदार अहोरात्र झटले. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच ही ७२ वी पदभ्रमंती मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली आणि सहभागी झालेल्या प्रत्येकाला एक अविस्मरणीय अनुभव मिळाला.
या मोहिमेत डॉ.गणेश राख,आय आर एस, शिवकुमार साळुंखे, अतिरिक्त आयुक्त केद्रीय G ST पूणे संकेत देशमुख, आय आर एस पन्हाळा बिडीओ सोनाली माडकर, चंदगड बिडिओ, पनवेल तहसिलदार इंगळे, एव्हरेस्ट विर भगवान चवले सहभागी झाले होते.







