लिंब विधीसाठी प्रति मानसी साठ रुपये द्यावे लागणार*
जिल्हा रेणुका भक्त संघटनेची माहिती
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे पदाधिकारी व मानाच्या जगाचे प्रतिनिधी, गाडी प्रमुख सभासद व रेणुका भक्त यांची चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला.सौंदती यात्रेच्या वेळी जुगुळ भावी कुंड येथे सत्यमा देवी कुंडात स्नान करून लिंब नेसणे हा सौंदत्ती यात्रेतील मुख्य विधी आहे. या ठिकाणी सत्यमा देवी मंदिराचे ठेकेदार व कोल्हापूरहून जूगुळ भावी कुंड येथे गेलेल्या मानाच्या चार जगाच्या (जन जोगती) सेवेकरांच्याकडून रेणुका भक्तांना लिंब नेसवण्याचा विधी केला जातो.
गेली चार वर्ष या विधीसाठी मानसी पन्नास रुपये कर आकारला जात होता. त्यातील ठेकेदाराणे ठरवल्याप्रमाणे हिस्सा ठेकेदारास द्यावा लागतो. कोल्हापूरहून गेलेले मानाचे चार जग हे साधारण पंधरा दिवस त्या ठिकाणी मुक्कामास असतात भक्तांच्या कडून मिळालेल्या लिंबाच्या पैशावर त्या ठिकाणी त्यांचा खर्च अवलंबून असतो. सर्वच बाबतीत खर्च वाढला असल्याने चालू वर्षापासून लिंब नेसण्याच्या विधी करिता प्रति मानसी साठ रुपये मिळावे अशी विनंती मानाच्या जगाचे मधूआई जाधव, अमृत आळवेकर , दत्ता पवार, गजू उन्हाळे यांनी केली. त्यांची ही मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेने व उपस्थित सर्व रेणुका भक्तांनी व गाडी प्रमुखांनी मान्य केली आहे. यावेळी जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे सर्व पदाधिकारी व विनोद चव्हाण, प्रभाकर पायमल, चंद्रकांत वारके आनंदराव रेडेकर यांच्यासह अनेक गाडी प्रमुख व भक्त उपस्थित होते.
सौंदत्ती यात्रेस जाणाऱ्या लिंबविधी करणाऱ्या सर्व रेणुका भक्तांनी प्रति मानसी साठ रुपये द्यावेत असे आवाहन जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री युवराज मोळे व सरचिटणीस श्री गजानन विभुते यांनी केले आहे..