बिद्री साखर कारखाना निकालावर पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची मुंबईतून रेल्वेमधूनच दिलेली ही प्रतिक्रिया
कोल्हापूर/प्रतिनिधी : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी अतिशय ऐतिहासिक निकाल दिला. हा प्रचंड विजय मिळवून दिल्याबद्दल या साखर कारखान्याचे सर्व शेतकरी सभासद, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. या निवडणुकीत सर्वच कार्यकर्ते अत्यंत जिवापाड राबले. त्यांनी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी केले. उमेदवारी अर्ज भरूनही ज्यांना नाईलाजास्तव माघार घ्यावी लागली त्या सर्व उमेदवारांचेही मनःपूर्वक आभार. या सर्वांचा हा सांघिक विजय आहे. हा विजय अत्यंत विनियाने स्वीकारत आहोत.
साखर व्यवसायामध्ये आणि साखर कारखानदारीमध्ये पुढील काळात अनेक संकटे आहेत. गेल्या पावसाळ्यात पाऊस कमी पडलेला आहे. त्यामुळे हंगाम कमी काळ चालणार आहे. नोकरांना बसून पगार द्यावा लागणार आहे. साखरेची दर ळही वाढत नाहीत. अशा अनेक समस्या आहेत. तरीसुद्धा; या समस्यांवर या कारखान्याचे चेअरमन श्री. के. पी. पाटील, ज्यांच्यावर तमाम शेतकऱ्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे ते निश्चितच मार्ग काढतील. सर्वात जास्तीत- जास्त दर ते दिल्याशिवाय राहणार नाहीत. श्री. के. पी. पाटील आणि त्यांचे सर्वच संचालक मंडळ शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि इतर अनेक घटकांच्या अनेक अपेक्षा आहेत, त्या सर्वच अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होतील.
नूतन संचालक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कारकीर्दीस मनःपूर्वक शुभेच्छा. या पुढील काळातही अतिशय स्वच्छ, पारदर्शी आणि सभासदाभिमुख कारभार करून ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्यात. एवढ्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये अनेक स्थित्यंतरे असतानासुद्धा या सगळ्यात शेतकरी सभासदांनी जो विश्वास व्यक्त केलेला आहे तो विश्वास आपल्याला खोटा ठरवायचा नाही. तो विश्वास सार्थ करून दाखवायचा आहे. त्यासाठी आपण सर्वजण आजपासून आतापासूनच कामाला लागूया असे आवाहन पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी केले.