चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाबद्दल सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे साकारावेत
भाजपच्या वतीने यावर्षीच्या गणेशोत्सवात विशेष स्पर्धा
कोल्हापूर/प्रतिनिधी : नुकतीच चांद्रयान तीन मोहीम भारताने यशस्वी करून दाखवली. संपूर्ण जगभरातून भारतीय शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. भारताचे अंतराळ संशोधन क्षेत्रातील यश आणि प्रगती हे चांद्रयान तीनच्या यशाचे द्योतक आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या वतीने, सार्वजनिक गणेशोत्सवासाठी एक अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. चंद्रयान तीनचे यश या विषयावर कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी देखावे सादर करावेत, यासाठी भाजपच्या वतीने एक स्पर्धा आयोजित केली आहे. चांद्रयान तीन विषयी उत्कृष्ट देखावे साकारणाऱ्या मंडळांना पहिले बक्षीस म्हणून पंचवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या मंडळाला १५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांकाच्या मंडळाला दहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह दिले जाईल. याशिवाय पाच उत्तेजनार्थ बक्षीस दिली जाणार असून, प्रत्येक मंडळाला पाच हजार रुपये रोख बक्षीस म्हणून दिले जातील. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी या स्पर्धेची घोषणा केली असून, यावर्षी जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चंद्रयान तीनच्या संदर्भात देखावे साकारावेत, असे आवाहन केले आहे. स्पर्धेतील प्रवेश आणि अन्य माहितीसाठी नागाळा पार्क येथील भाजपच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.