Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्याजन्मजात व्यंग असलेल्या रुग्णाच्या पाठीवरील ५ किलोची कॅन्सरची गाठ काढण्यात यश

जन्मजात व्यंग असलेल्या रुग्णाच्या पाठीवरील ५ किलोची कॅन्सरची गाठ काढण्यात यश

जन्मजात व्यंग असलेल्या रुग्णाच्या पाठीवरील ५ किलोची कॅन्सरची गाठ काढण्यात यश

-डी. वाय. हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रियाअब्दुललाट येथील रुग्णाला जीवदान

कोल्हापूर/प्रतिनिधी : जन्मजात शारीरिक व्यंग असलेल्या व त्यामुळे अपंगत्व आलेल्या अब्दुललाट येथील ३८ वर्षीय रुग्णाच्या पाठीवरील सुमारे ५ किलोची कॅन्सरची गाठ काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. डॉ. वैभव मुधाळे व त्यांच्या सहकाऱ्यानी अतिशय आव्हानात्मक असलेली शस्त्रक्रिया कौशल्याने हाताळून सबंधित रूग्णाला कॅन्सरमुक्त केले आहे.अब्दुललाट येथील हा रुग्ण अतिशय गरीब कुटुंबातील आहे. जन्म:जात व्यंगामुळे त्याला अपंगत्व आले असून मणका व फुफ्फुसाचेही विकार आहेत. त्याच्या पाठीवर गाठ उठून ती कुबडाप्रमाणे मोठी झाली होती. बेताची आर्थिक परिस्थिती आणि वैद्यकीय ज्ञानाचा अभाव यामुळे सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, असह्य वेदना होऊ लागल्याने त्यांनी तपासणी केली असता कॅन्सरचे निदान झाले. त्यामुळे रुग्णासह सर्व कुटुंबीय हादरून गेले. अनेक डॉक्टरांकडे त्यांनी शस्त्रक्रियेसाठी संपर्क साधला. मात्र रुग्णाची शारीरिक स्थिती व असलेला मोठा धोका पाहता सर्वांनी शस्त्रक्रियेसाठी नकार दिला.
त्यानंतर हा रुग्ण डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे संबंधित रूग्ण तपासणीसाठी दाखल झाला. कर्करोग तज्ञ डॉ. वैभव मुधाळे यांनी त्याच्या सर्व चाचण्या करून घेतल्या. हि गाठ कॅन्सरचीच असल्याचे निदान झाल्यानंतर डॉ. मुधाळे यानी शस्त्रक्रिया करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे नातेवाईकांना सांगितले. या रुग्णाला भूल देणे आणि ऑपरेशन करणे हे दोन्ही गोष्टी आव्हानात्मक होत्या. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांचे समुपदेशन करून शस्त्रक्रिया व त्यातील धोक्याचीही कल्पना देण्यात आली. नातेवाईकांच्या संमतीनंतर त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून पाठीवरील सुमारे पाच किलो वजनाची कॅन्सरची गाठ काढण्यात आली. सुमारे तीन तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली असून संबंधित रुग्ण कॅन्सरमुक्त झाला आहे. दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर उपचार सुरु असतानाचा या रुग्णाच्या वडिलांचे निधन झाले, यावेळी हॉस्पिटल टीमने रुग्णाला मानसिक पाठबळ देऊन आधार दिला.
मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा व वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेसाठी डॉ. वैभव मुधाळे याना सर्जरी विभाग प्रमुख डॉ. शीतल मुरचुटे, डॉ. अभिनंदन काडीयाल, भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप कदम, भूलतज्ञ डॉ. रश्मी चव्हाण व टीमचे सहकार्य लाभले. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव व्ही. व्ही. भोसले, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यानी डॉ. वैभव मुधाळे आणि टीमचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments