केडीसीसी बँकेच्या ठेवीवरील व्याजात पुन्हा भरघोस वाढ
८.०५ टक्के व्याजदराची ध्येयपूर्ती ठेव योजना पुन्हा सुरू – संचालक मंडळाचा महत्वाचा निर्णय
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेवीवरील व्याजदरात भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या व्याजदराच्या वाढीनंतर ठेवीवरील कमाल व्याजदर साधारणतः आठ टक्के होतो. बँकेने चालू आर्थिक वर्षात नऊ हजार, ५०० कोटी रुपयांच्या ठेवींच्या पूर्तीचा संकल्प केलेला आहे. यासाठी बँकेने २५ बी.पी.एस.ने व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, व्यक्ती व संस्था ठेवीदारांच्या आग्रहास्तव बँकेने एक जून २०२३ पासून ८.०५ टक्के इतक्या ज्यादा व्याजदराची “ध्येयपूर्ती ठेव योजना” ही योजना पुनश्च सुरू केली आहे. ही योजना मर्यादित कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
बँकेचे अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी बँक ठेवीदारांना ज्यादा व्याजदर देण्यामध्ये नेहमीच अग्रभागी असते. ठेवीदारांनी बँकेच्या विविध योजनांसह ध्येयपूर्ती योजनेचा मागील वर्षीही ठेवीदारांनी लाभ घेतलेला आहे.यावेळी बँकेचे अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ, उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, सौ. स्मिता गवळी आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.