महिलानी सोशल मिडीयाचा वापर जबाबदारीने करावा – निर्भया पथकाच्या एपीआय मेघा पाटील यांचे आवाहन
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटलिटीमध्ये महिला दिन उत्साहात
कोल्हापूर/ प्रतिनिधी : सध्याच्या काळात सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊन महिलांच्या बदनामीचे, शोषणाचे प्रकार वाढीस लागले आहेत. हे गैरप्रकार रोखण्यासाठी महिलांनी सोशल मिडीयाचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा असे आवाहन निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघा पाटील यानी केले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटलिटीमध्ये आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.आजच्या या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात महिलानी सर्वच क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र महितीच्या युगात फेसबुक, व्हाटसअपसह सर्वच माध्यमांच्या बेसुमार वापर होत आहे. आजची तरुणाई सर्वाधिक काळ सोशल मिडीयावरच व्यस्त करत आहे. या माध्यमातून नवी माहिती व ज्ञान मिळत असले तरी त्याचा धोकाही आहे. सोशल मिडीयावरील आपले फोटो आणि अन्य महितीच्या आधारे ब्लॅकमेल करण्याचे, बदनामी करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे महिलांनी जबाबदारीने या माध्यमाचा वापर करावा. आपले फोटो, खासगी माहिती विचारपूर्वक शेअर करावी असे आवाहन त्यांनी केली.
निर्भया पथकाच्या माध्यमातून गुन्हेगारीला आळा घालण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मात्र, त्यासाठी अन्याय झालेल्या महिलांनी सक्षमपणे पुढे येऊन तक्रार नोंदवणे गरजेचे आहे. महिला शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनल्यास कोणत्याही अन्यायाचा प्रतिकार करू शकतात. महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे अस्तित्वात आहेत, त्याचाही प्रभावी वापर तरुणींनी करावा, असे आवाहन त्यानी केले. महिला सुरक्षितता व त्यांचे कायदेशीर हक्क याबाबत पाटील यानी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर निर्भया पथकाचे संपर्क क्रमांक, अँप, टोल फ्री नं. यांची माहितीही त्यांनी दिली.यावेळी केक कापून सर्व महिला सहकाऱ्यांनी जागतिक महिला दिन साजरा केला. यावेळी डी. वाय पाटील ग्रुपच्या सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्राचार्य रुधीर बारदेसकर, सुप्रीता जोशी, मयुरी सोहनी, मनीषा जोगडे, रुपाली संदे, मेघना महाडेश्वर, रीमा करजगार, दिपाली पोवार, आसावरी चव्हाण, मृणाल बेडेकर, मैथिली जाधव यांच्यासह महिला कर्मचारी, निर्भया पथकातील सहकारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कुलपती डॉ संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन व सहकार्य लाभले.