छत्रपती संभाजी महाराज दोन दिवसीय धाराशिव जिल्हा दौऱ्यावर
भूम तालुक्यातील स्वराज्य संघटनेच्या ५१ शाखांचे उद्घाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी : भूम परांडा जिंकण्यासाठी
सर्वसामान्यांच्या हाक्कासाठी अशी राजकीय टॅगलाईन घेऊन स्वराज्यने फ्लेक्स होर्डिंग्जच्या माध्यमातून प्रचार प्रसार केला आहे.स्वराज्य संघटनेच्या बांधणीसाठी छत्रपती संभाजी राजे आज व उद्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते भूम तालुक्यातील स्वराज्य संघटनेच्या आहे ५१ शाखांचे उद्घाटन करण्यात येत आहे. आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या मतदारसंघात हा दौरा असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप यावेळी संभाजी महाराज यांनी केला. आरोग्य मंत्री सावंत यांच्या जिल्ह्यातील ही स्थिती असेल तर राज्यातील आरोग्य यंत्रणेचे काय असेल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भूम येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य यंत्रणेचा पंचनामा करणार असल्याचेही संभाजी महाराजांनी सांगितले. संभाजीराजे या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार का अथवा विधानसभेला उमेदवार देणार का? असा चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी गावच्या पारावर बसलेल्या ग्रामस्थांसोबत चर्चा केली, यामध्ये ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला.
यात आरोग्याचा प्रश्न, उप जिल्हा रुग्णालय, दिवसा लाईट चा प्रश्न, शालेय समस्या, उजणीचे पाणी असे असंख्य प्रश्न उपस्थित केले. राजेंनी आमदार, खासदार व पालकमंत्री यांच्याकडे आवाज उठवावा अशी मागणी केली. प्रश्न विचारायला शिका घाबरायचं नाही आता स्वराज्य तुमच्या सोबत आसल्याचा विश्वास संभाजीराजेंनी भूमवासियांना दिला.