लोककलासह सांस्कृतिक कार्यक्रमांची कणेरी मठावर सात दिवस पर्वणी
कोल्हापूर / प्रतिनिधी : देशाच्या विविध प्रांतातील लोककला, लोकसंस्कृती यासह सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीच उपस्थितांना मिळणार आहे. हजारो कलावंत यामध्ये सहभागी होणार असून रोज सायंकाळी भव्य सभामंडपात हे कार्यक्रम पहायला मिळतील. याशिवाय काही व्यासपीठावर दिवसभर देशाच्या विविध राज्यातून आलेले कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
कणेरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सुमंगलम पंचभूत लोकोसवात रोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील संस्कृतीचे या माध्यमातून दर्शन घडविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक लोककला सादर होणार आहेत. त्यामध्ये जागर लोककलेचा, महाराष्ट्राची लोकधारा, वाद्य महोत्सव, वाद्य जुगलबंदी आणि लोकनृत्य, शिवराष्ट्र, शिवगर्जना अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे.रोज देशाच्या विविध प्रांतातील नामवंत कलावंत आपली लोककला सादर करतील. त्यामध्ये केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, आसाम, गुजरात यासह अनेक राज्यातील लोककलांचा समावेश आहे. कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपात रोज सायंकाळी पाच नंतर हे कार्यक्रम होतील. याशिवाय काही मुक्त व्यासपीठ उभारण्यात आले आहेत. तेथे दिवसभर कलावंत आपली कला सादर करणार आहेत. या निमित्ताने देशाच्या सांस्कृतिक ऐक्याचे दर्शन मठावर घडविण्यात येणार आहे.
कार्यक्रम
२० फेब्रुवारी .. जागर लोककलेचा (सहभाग गणेश चंदनशिवे, उर्मिला धनगर, देवानंद माळी, मीरा उमप, कडूबाई खरात)
२१ फेब्रुवारी.. महाराष्ट्राची लोकधारा (सहभाग.. कृष्णा कदम व त्यांचे सहकारी )
२२ फेब्रुवारी.. वाद्य महोत्सव (सहभाग.. संदीप पाटील आणि दुर्मिळ वाद्य वाजविणारे कलाकार )
२३ फेब्रुवारी.. वाद्य जुगलबंदी आणि लोकनृत्ये (सहभाग.. उदय साटम व सहकारी)
२४ फेब्रुवारी शिव महाराष्ट्र (सहभाग.. अमेय पाटील व त्यांचे सहकारी )
२५ व २६ फेब्रुवारी शिवगर्जना
चौकट
दहा लाखावर विद्यार्थ्यांची उपस्थिती
पर्यावरण जागृतीसाठी आयोजित केलेल्या या लोकोत्सवास राज्यभरातील दहा लाखावर शालेय विद्यार्थी भेट देणार आहेत. आठवी, नववी व अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घ्यावा असे नियोजन राज्याच्या शिक्षण विभागाने केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून रोज एक दोन तालुक्यातील विद्यार्थी येतील. या सर्व विद्यार्थ्यांची जेवणाची सोय मठावर करण्यात आली आहे.