दिल्ली महापालिका विजयाचा कोल्हापूरमध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात साखर पेढे वाटून केला आनंद साजरा
कोल्हापूर/प्रतिनिधी : दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने बहुमताचा आकडा गाठला. भाजपच्या पंधरा वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत १३४ जागा जिंकून ‘आप’ने निर्विवाद वर्चस्व मिळवले. दिल्ली महापालिकेत मिळवलेल्या विजयाचा जल्लोष कोल्हापुरात ‘आप’ कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात साखर पेढे वाटून साजरा केला.
दिल्ली सिर्फ झांकी है, कोल्हापूर अभी बाकी है च्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.दिल्ली महापालिकेच्या निवडणुका गेल्या नऊ महिन्यांपासून प्रलंबित होत्या. भाजप ने दिल्लीतील तीन महापालिकांचे एकत्रीकरण करण्याचा घाट घालून वॉर्ड रचनेत बदल केले, निवडणुका टाळल्या, केंद्रीय यंत्रणांचा वापर करून भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले, गुजरात व महापालिका निवडणुका एकत्र जाहीर केल्या गेल्या. अशा अनेक क्लृप्त्या वापरून देखील दिल्लीच्या मतदारांनी ‘आप’ला बहुमत दिले. आगामी कोल्हापूर महापालिकेत देखील आम्ही ताकदीने उतरणार असून दिल्ली सारख्या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे ‘आप’चे प्रदेश प्रवक्ते, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विलास रजपूत, निलेश रेडेकर, दिलीप पाटील, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, संजय साळोखे, मोईन मोकाशी, आदम शेख, दुष्यंन्त माने, विजय हेगडे, मयूर भोसले, विलास पंदारे, अमरसिंह दळवी, इलाही शेख, शशांक लोखंडे, भाग्यवंत डाफळे, समीर लतीफ, रवींद्र राऊत, बसवराज हादिमनी, राजेश खांडके, प्रथमेश सूर्यवंशी, शुभंकर व्हटकर, विजय भोसले, राम शिंगाडे, आदी उपस्थित होते.