जगविख्यात स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या ‘माइंडस्केप ‘ पुस्तकाचे आज प्रकाशन
शाहू स्मारक भवनात भरणार दोन दिवसीय कलाकृतींचे प्रदर्शन
कोल्हापूर : दि.२० (प्रतिनिधी) देशातील पहिले विशेष समर्पित आणि जगविख्यात स्पाइन सर्जन डॉ शेखर भोजराज तसेच त्यांच्या स्पाईन फाऊंडेशनच्या वतीने उद्या शनिवार दि.२१ व रविवार दि.२२ मे २०२२ रोजी राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन,दसरा चौक येथे कलाकृतींचे निधी उभारणीचे प्रदर्शन भरवले जात आहे. दि.२१ रोजी या कलाकृतींचे सायंकाळी साडेपाच वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.शेखर भोजराज यांच्या दुसरे कला पुस्तक ‘माइंडस्केप ‘ चे प्रकाशनही होणार आहे.अशी माहिती डॉ.संदिप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान कोल्हापूर येथे दाखल झाल्यानंतर आज सकाळी डि.वाय.पाटील हाॅस्पिटल येथे स्पाईन फाऊंडेशनमार्फत मणक्यांच्या गुंतागुंतीच्या मोफत शस्त्रक्रिया डॉ.शेखर भोजराज यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या. स्पाईन फाऊंडेशनची स्थापना सन १९९८ मध्ये डॉ.शेखर भोजराज आणि त्यांच्या पत्नी डॉ. शिल्पा भोजराज यांनी ग्रामीण व शहरी भारतातील गोरगरीबांना मणक्याची काळजी देण्यासाठी केली आहे .कोट्यावधी भारतीयांना पाठीच्या कण्यातील वेदना,पाठदुखीपासून ते मणक्याच्या अपंगत्वापर्यंत त्रास होतो.सर्वात जास्त पीडित गरीब आणि ग्रामीण भागात राहणारे आहेत.आपल्या लोकसंख्येपैकी ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात असुन,आरोग्य सुविधा बाबतीत अजुनही मागे आहेत.यातील बहुतांश पाठीच्या समस्यांनी वेढलेले असतात.
शेतकऱ्यांना पिके पेरणी आणि नांगरण्यासाठी सतत वाकावे लागते.महिलांना डोक्यावर पाणी घेऊन मैल मैल चालावे लागते.खराब रस्त्यांवरून बैलगाडीतून प्रवास अशा अनेक कारणांमुळे मणक्याचे विकार उद्भवतात.त्यात गरिबीमुळे कुपोषितपणा आणि मणक्याची काळजी व उपचारिकडे दुर्लक्ष होते..आतापर्यंत, स्पाईन फाउंडेशनने हजारो रुग्णांवर उपचार केले आहेत.देशभरात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या असंख्य शिबिरांमध्ये शेकडो ऑपरेशन्स केली आहेत.देहरादून ते सित्तिलिंगी, गडचिरोली ते रांची.सर्वत्र विनामूल्य उपचार करण्यात आल्याचे डॉ.शेखर भोजराज यांनी यावेळी सांगितले .
डॉ.भोजराज यांना लहानपणापासूनच कलेची विशेष आवड होती.त्यांनी आपल्या वैद्यकीय प्रॅक्टिसच्या बरोबरीने आपल्या कलेचा सराव सुरू ठेवला.या वैयक्तिक छंदातुन मोबाईल फोटोग्राफी,स्केचिंग,पेंटिंग,मिक्स मेडिया चा वापर करुन,नैसर्गिक तसेच सामाजिक आशय असलेल्या वैशिष्ट्य पुर्ण कलाकृतींच्या समावेश आहे.या कलाकृतींच्या प्रदर्शनातुन फौंडेशनला आर्थिक मदत मिळविण्यात येते.तसेच फाउंडेशनला देणगी देणा-यांना डॉ.भोजराज यांची कलाकृती वा ‘माइंडस्केप’ची प्रत देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला डॉ.सलीम लाड,डॉ.प्रदीप पाटील, इरफान बोरगावे,उदय पाटील यांच्यासह द ब्रॅण्ड बुक कंपनीचे भागीदार ममता देसाई,जाॅय चौधरी उपस्थित होते.