गडहिंग्लजमध्ये श्री हनुमान मंदिराचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा उत्साहात
४८ लाखांच्या निधीसह लोकवर्गणीतून बांधले सुंदर मनोहारी मंदिर
गडहिंग्लज/प्रतिनिधी : गडहिंग्लजमध्ये श्री हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या विकास निधीतून ४८ लाखांचा फंड व लोकवर्गणीतून हे सुंदर व मनोहर मंदिर साकारले आहे. आतापर्यंत सहाशेहून अधिक मंदिरांच्या बांधकामांसाठी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी एक हजार कोटींहून अधिक निधी दिल्याबद्दल संत श्री. नामदेव महाराज यांचे वंशज श्री. रामदास महाराज यांच्या हस्ते मंत्री श्री मुश्रीफ यांचा सत्कार झाला.
ग्रामविकास मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, गुरुवर्य श्री. किसन महाराज यांच्या प्रेरणेने साकार झालेल्या या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा मला मोठा आनंद आहे. श्री हनुमान हे दैवत शक्ती आणि स्वामी भक्तीचे प्रतीक आहे. या मंदिरासाठी अजूनही लागेल, तो निधी देऊ. ते पुढे म्हणाले, गडहिंग्लज शहरातील श्री हनुमान मंदिरासह, श्री.विठ्ठल मंदिर, श्री.जडेयसिद्धेश्वर मंदिर, श्री.लक्ष्मी मंदिर आदी सहा ते सात मंदिरांसाठी सात कोटीहून अधिक निधी देऊ शकलो याची धन्यता वाटते. देव असण्याबद्दल मतमतांतरे आहेत, परंतु माझी अशी श्रद्धा आहे की देवावरील भक्ती आणि श्रद्धेमुळे माणूस ? अनाचारापासून लांब राहतो आणि चांगल्या कर्माला प्राधान्य देतो. गडहिंग्लज ही जिल्ह्याचे प्रमुख सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र आहे.
सुप्रसिद्ध वक्ते व नामवंत प्रवचनकार प्रा. शिवाजीराव भुकेले म्हणाले, ६०० हून अधिक मंदिरांच्या बांधकामासाठी एक हजारहून अधिक कोटींचा निधी देणारे श्री. मुश्रीफ हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आणि मंत्री आहेत. हनुमानाची छाती फाडल्यानंतर ज्याप्रमाणे रामाचे दर्शन झाले, तसे मुश्रीफसाहेबांच्या रूदयात गोरगरीब जनतेचे दर्शन होते. स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांच्यानंतर ते लोकाभिमुख ठरलेले ग्रामविकास मंत्री आहेत, असेही ते म्हणाले.
स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात सिद्धार्थ बन्ने म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये बांधलेल्या प्रभू श्री. राममंदिराची प्रेरणा घेऊन आम्ही या मंदिराच्या बांधकामाला हात घातला. पंढरपूर नंतरचे अकरा महारुद्र मारुतीची प्रतिष्ठापना असणारे दुसरे मंदिर आहे.
*”मंदिरवाले बाबा”*
प्रा.डॉ.शिवाजीराव भुकेले म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे सामाजिक आणि राजकीय कारकीर्द एवढी उत्तुंग आहे की, गोरगरिबांच्या सेवेत ते श्रावणबाळ वाटतात. रुग्णसेवेत ते महाडॉक्टर वाटतात. निराधारांना ते आधार वाटतात तर धार्मिक कार्याची बाजू घेतली तर ते मंदिरवाले बाबा वाटतात.
यावेळी अरविंद कित्तूरकर, शेखर येरटी, सतीश पाटील, उदय जोशी, प्रा शिवाजीराव भुकेले, सिध्दार्थ बन्ने, बसवराज आजरी, अनिल गुरव, शर्मिला मालडकर, रेश्मा कांबळे, श्रीमती शारदा आजरी, उर्मिला जोशी, गुंड्या पाटील, महेश सलवादे, रश्मिराज देसाई, चंद्रकांत मेवेकरी, पुनम म्हेञी आदी मान्यवर उपस्थित होते.आभार बसवराज आजरी यांनी मानले.