येत्या काळासाठीचे अचूक नियोजन आणि काळानुसार बदल हेच स्पर्धेत टिकण्याचे गमक – संजय कोठा
केआयटीत अत्याधुनिक व्हर्चुअल व व्हीएफएक्स लॅबचे उदघाटन
कोल्हापूर /प्रतिनिधी : “आजपर्यंत मिळालेल्या यशावर समाधानी न राहता पुढच्या काळाचे योग्य नियोजन करून आधुनिक जगाच्या मागणीनुसार स्वत:मध्ये योग्य ते बदल केले तर स्पर्धेच्या जगात टिकणे सहज शक्य आहे.” असे मत अदानी ग्रुपचे सहअध्यक्ष व अदानी एअरपोर्ट आणि लॉजिस्टिकचे मुख्य डिजिटल आणि बिझनेस ट्रान्सफॉर्मशन मुख्याधिकारी मा. संजय कोठा यांनी व्यक्त केले. ते केआयटीमध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक व्हर्चुअल लॅब उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, विश्वस्त सचिन मेनन उपस्थित होते.
केआयटीच्या गव्हर्निंग कौन्सिलवर असलेले मा. संजय कोठा हे गेले दोन दिवस केआयटीच्या ऑफिशियल भेटीसाठी कोल्हापूरमध्ये आले होते. या दरम्यान केआयटीत होणाऱ्या विविध उपक्रमांची चर्चा करून केआयटीमध्ये विश्वस्त प्रतापसिंह रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अत्याधुनिक व्हर्चुअल व व्हीएफएक्स लॅबचे उदघाटन मा. कोठा यांच्या हस्ते झाले . या लॅबद्वारे विद्यार्थ्यांना गेम, अनिमेशनसह अनेक क्षेत्रात सनदी उपलब्ध होणार आहेत.
या उदघाटन सोहळ्यानंतर केआयटीमधील अध्यापन, प्रयोगशाळा, सुविधा आणि वातावरण यांचे कौतुक करून श्री कोठा यांनी लवकरच केआयटी बरोबर सामंजस्य करार करून केआयटी मध्ये अदानी ग्रुपचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ करण्याबाबत प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यांच्या या भेटीमध्ये केआयटीमध्ये लॅब उदघाटन, सर्व विभागप्रमुख आणि व्यवस्थापन यांच्याशी चर्चा, सर्व शिक्षक स्टाफशी चर्चा व विद्यार्थ्यांशी संवाद अशा भरगच्च कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून त्यांनी अमूल्य मार्गदर्शन केले.
श्री. संजय कोठा यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांच्या उद्योग क्षेत्रातील अनुभवाचे दाखले देत आदर्श नेतृत्वाची वैशिष्टये सांगितली आणि उपस्थित विद्यार्थ्यांना भारताचे विविध क्षेत्रातील भावी नेतृत्व बनण्याचे आवाहन केले. यामध्ये त्यांनी समस्या उकल कौशल्य, संवाद कौशल्य, दूरदृष्टीकोन, स्वयंशिस्त आणि मानवता या मुल्यांना अधोरेखित केले. याचबरोबर त्यांनी कौशल्य आणि तंत्रज्ञान यांची सांगड असणारी शिक्षण प्रणाली भारताची भावी पिढी घडण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मत व्यक्त केले. या वेळी प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज मुजुमदार यांनी महाविद्यालयाची माहिती दिली. अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, विश्वस्त सचिन मेनन यांनी संस्थेचा इतिहास व भविष्यातील उद्दिष्टे स्पष्ट केली. संगणक शास्त्र अभियांत्रिकीच्या प्रमुख ममता कलश यांनी नियोजन केले यावेळी सर्व अधिष्ठाता व विभागप्रमुख उपस्थित होते.