डॉ.वाईकर दांपत्य आधुनिक काळातील अॅनाकोंडा,अब्रुनुकसानी दाव्याच्या धमक्यांना भिक घालत नाही – श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर/प्रतिनिधी : सुरवातीलाच मी आपल्या निदर्शनास आणून देवू इच्छितो की, माझ्याकडे दाखल झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने लोकांना अनाकोंडाप्रमाणे गिळून त्यांचे जीव घेण्याचे पाप यासह रुग्णांना मानसिक त्रास व आर्थिक लुबाडणूक करण्याचे काम डॉ.कौस्तुभ वाईकर यांनी केले आहे आणि यात त्यांच्या पत्नी डॉ.अनुष्का वाईकर ही तितक्याच सहभागीदार आहेत. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने अशा “कसाई” डॉक्टर विरोधात तात्काळ कारवाई करून घेतलेला निर्णय हा डॉ.वाईकर यांच्या जाचास बळी पडलेल्या रुग्णांच्या आणि नातेवाईकांचा प्राथमिक विजय आहे. डॉ.वाईकर यांच्या विरोधात दाखल होणाऱ्या तक्रारीत वाढ होत असून, डॉ.वाईकरच्या अन्यायास बळी पडलेले रुग्ण, नातेवाईक तक्रार करण्यास पुढे येत आहेत. याची माहिती सर्वच प्रसिद्धी माध्यमांनी घ्यावी.
रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा छळ करायचा, आर्थिक लुबाडणूक करायची, रुग्णावर चुकीचे उपचार करायचे हा धंदाच डॉ.वाईकर दांपत्यानी कायम ठेवला आहे. कोरोना काळात समस्त आरोग्य यंत्रणा माणुसकीच्या नात्याने रुग्णांसाठी देवदूताचे काम करत आहे. ९८% डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आपली जबाबदारी ओळखून खरी रुग्णसेवा करण्यात मग्न आहेत, अशा सर्वांच्या कार्याला माझा सलामच आहे. परंतु, डॉ.वाईकर दांपत्यासारखे एक-दोन टक्के डॉक्टर पैश्याच्या हव्यासापोटी लोकांची करत असलेली लुट ही संपूर्ण आरोग्य यंत्रणेस बदनामी करणारी ठरत आहे. डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याच्या धमकीस मी भिक घालत नाही. अशा दाव्यांना घाबरून समाजहिताची कामे थांबविणे माझ्या रक्तात नाही. यापूर्वीही एका माजी मंत्री महोदयांच्या सांगण्यावरून पोलीस अधिकाऱ्यास हाताशी धरून खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पण, अशा खटल्यांची पर्वा जनहिताची कामे करताना मी करत नाही. या उलट डॉ.वाईकर नागरिकांची दिशाभूल करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
माझा आणि वाईकर दांपत्याचा कोणताही वैयक्तिक वाद नाही, कि कोणता मालमत्तेवरून वाद नाही. पण, डॉ.वाईकरच्या कृष्णकृत्यास बळी पडलेल्या नागरिकांकडे पाहून त्यांना न्याय देण्यासाठी हा आपला लढा आहे आणि या लढ्यात रोज एक- दोन तक्रारदार स्वत:हून सामील होत आहेत. माझ्या सामाजिक कार्यात मी हजारो रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया, उपचाराचा लाभ दिला. स्वत: जावून मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील रुग्णालयात रुग्णांना दाखल केले आहे. याची माहिती डॉ.वाईकर यांनी आधी घ्यावी. डॉ.वाईकर कडे गेलेला पेशंट एक तर कर्जबाजारी होतोच पण, जिवंत परत येण्याची शाश्वती नाही, याची मला खात्री आहे. कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कट प्रॅक्टीस करणाऱ्या काही डॉक्टर्स कडून २० ते ३० टक्के कमिशन देवून नातेवाईकांना फसवून पेशंट डॉ.वाईकर च्या रुग्णालयात दाखल केले जातात. आणि पेशंट दाखल झाला कि त्याला आयुष्यातून उठविण्याचे काम डॉ.वाईकर दांपत्य अगदी सहजपणे करून जातात.
दाखल झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने मी घेतलेल्या बैठकीचा आणि झालेल्या कारवाईचा धसका घेवून नागरिकांचे मन विचलित करण्यासाठीचा केविलवाणा प्रकार म्हणजे डॉ.वाईकर यांची कालची पत्रकार परिषद.. महानगरपालिका येथे झालेल्या बैठकीचा इतिवृत्त मागवून तो डॉ.वाईकर यांनी तपासावा. लोकांच्या भावना डॉ.वाईकर यांच्याबाबतीत तीव्र असून त्याचा प्रत्यक्ष अनुभव आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी घेतला आणि तात्काळ कारवाईचा निर्णय दिला.
सिद्धांत हॉस्पिटलमध्ये नैतिकतेने काम चालू असल्यास, रुग्णांच्या तक्रारी दाखलच का होतात? याचा विचार डॉ.वाईकरनी करून कृतीत बदल करावा. जर पेशंटचा बळी गेला नसेल तर शासनापासून सिद्धांत हॉस्पिटलने माहिती लपविण्यामागे अथवा माहिती अपलोड न करण्यामागचे गौडबंगाल काय आहे? गत कोरोना काळापासून आजपर्यंत सिद्धांत हॉस्पिटल मध्ये दाखल झालेले रुग्ण आणि मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची सविस्तर माहिती डॉ.वाईकर यांनी प्रशासनाकडे सादर करावी, यातून सत्यस्थिती सर्वांच्या समोर येईल.
मला कोणालाही बदनाम करण्याचा वैयक्तिक हेतू नाही. पण, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार काम करण्याची आपली पद्धत असून, लोकांवर होणारा अन्याय यापुढेही खपवून घेतला जाणार नाही. डॉ.वाईकर डॉक्टरांच्या अशोभनीय कृत्यांच्या व्हिडीओ रुग्णांच्या नातेवाईकांकडे उपलब्ध असून, रुग्णांच्या नातेवाईकानी केलेले आरोप खोटे असल्याचे डॉ.वाईकर याने खुल्या मैदानात येवून सिद्ध करावेत.
डॉ.वाईकर यांनी काल पत्रकार परिषदेत असणारी न्यूरोसर्जन पदवी हि दि.०६.०७.२०२० मध्ये प्राप्त केल्याचे स्पष्ट दिसते. तर डॉ.वाईकर यांनीच महाराष्ट्र वैद्यकीय परिषद येथे सन २०१७ मध्ये सादर केलेल्या कागदपत्रांच्या अनुषंगाने त्यांच्याकडे M.S.(Genl. Surg.) या अहर्तेची नोंदणी त्यांच्याकडे असल्याचा खुलासा केला होता. त्यांच्या जुन्या प्राईम न्युरो अँन्ड स्पाईन इंटेन्सीव्ह केअर युनिट या रुग्णालयाच्या फाईलवर डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्या नावापुढे “DNB” उल्लेख असल्याचे स्पष्ट दिसत असून, यावरच त्यांचा खोटारडेपणा लक्षात येत आहे. त्यांच्या जुन्या प्राईम हॉस्पिटलच्या पॅनेलवर न्युरोसर्जरीकरिता असणाऱ्या डॉ.शंतनू अनिल गुंजोटीकर व डॉ.मदन भीमसेन जाधव यांनी या दवाखान्यात एकही शस्त्रक्रिया केली नसल्याचे प्रशासनास कळविले होते. तर डॉक्टर वाईकर यांनी सन २०१७ ते सन २०२० मध्ये न्युरोसर्जन पदवी मिळण्याच्या कालावधीत अधिकार नसताना केलेल्या न्युरोसर्जरीमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचा लेखाजोखा जनतेसमोर सादर करावा.
डॉ.वाईकर यांनी घरफाळा मालकांच्या नांवे असल्याचे म्हंटले आहे. पण, सदर जागेचा वापर डॉ.वाईकर करत असताना घरफाळा थकीत असलेल्या वास्तूवर आपण व्यवसाय थाटला आहे. तो भरण्याची नैतिकता डॉ.वाईकर यांच्यात नाहीच. पण, सदर जागेच्या मालकानेही करारपत्राप्रमाणे घरफाळा डॉ.वाईकर यांच्याकडून वसूल करावा, असा खुलासा केला आहे. त्यामुळे जनतेची आणि प्रशासनाची दिशाभूल कोण करते, हे यावरून समजते.
कोव्हीड १९ च्या बिलापोटी आपण लाखो रुपये आपण उकलतले जातात हे सिद्धांत हॉस्पिटलच्या बिलांवरून सिद्ध होते. लेखापरीक्षकांना चुकीची माहिती पुरवून कोव्हीड पॉझिटीव्ह पेशंटचे बिल निमोनिया किंवा इतर आजारावर नमूद करण्याचा डॉ.वाईकर यांचा हातखंडा उघडा पडला आहे. ते प्रशासनाच्या विरोधात मनमानी कारभार करतात म्हणून त्यांच्यावर कारवाई होत आहे, हे आधी डॉ.वाईकर यांनी जाणून घ्यावे. प्रशासन तक्रारदारांच्या तक्रारींवर योग्य काम करीत असून, तक्रारदारांना लवकरच प्रशासन न्याय देईल अशी आशा आहे.
सिद्धांत हॉस्पिटल नियमानुसार बांधले असते तर महानगरपालिका रुग्णालयावर दंडात्मक कारवाई का करेल? याचा खुलासा डॉ.वाईकर यांनी स्वत: रुग्णालयास महापालिकेने दिलेल्या नोटीस तपासून करावा.
राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीबा फुले हे जनतेचे कैवारी होते. या थोरपुरुषांची नांवे घेण्याची डॉ.वाईकर यांची पात्रता नाही. डॉ.वाईकर यांना रुग्णसेवा नाही, तर लोकांची लुट करण्याचा धंदा करायचा आहे. तो धंदा लवकरच बंद होईल, त्यामुळे डॉ.वाईकर यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि निस्वार्थी जनसेवा करायची असेल तर इतक्या वर्षात एकही जनसेवेचे काम केले असल्याचे डॉ.वाईकर यांनी दाखवून द्यावे.
कोरोना काळातच नाही तर माझ्या राजकीय आणि सामाजिक आयुष्यात मी अनेक समाजोपयोगी आणि लोकहिताची कामे केली आहेत. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिक आजही डॉ.वाईकर सारख्याच्या विरोधात न्याय मागण्यासाठी आपल्याकडे येतात. त्यामुळे लोकांनी मला दोनवेळा आमदार म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे माझ्या सामाजिक कार्यासाठी कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेस डॉ.वाईकरच्या प्रमाणपत्राची गरज नाही. सीपीआर रुग्णालयास एक कोटी रुपयांचे बेड, सुमारे ५० लाख रुपयांचे व्हेंटीलेटर, सीपीआर मधील स्वतंत्र कोरोना वॉर्ड निर्मितीत यश, अशी असंख्य कामे जनतेने पाहिली आहेत. आमदार श्री.लंके यांच्या जनसेवेची दखल घेणे स्वागतार्ह आहे. पण, डॉ.वाईकर यांनी कोरोना रुग्णांवर दहा रुपयात उपचार करणाऱ्या हैदराबाद मधील डॉ.व्हिक्टर इमॅन्यूएल यांच्या सारख्या अनेक डॉक्टरांचा वारसा घेण्याचे धाडस करावे आणि रुग्णांची लुट बंद करावी.
डॉ.अनुष्का वाईकर शासकीय सेवेत असताना, प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये प्रॅक्टीस करत होत्या. हे शासनाच्या नियमाचे उल्लंघन होते म्हणून त्यांनी आर्थिक हव्यासापोटी शासकीय सेवा बंद करून खाजगी व्यवसायात लखपती होण्यासाठीच राजीनामा देण्याचा मार्ग स्विकारला आहे. महिलांच्या सन्मानाच्या गोष्ठी डॉ.वाईकर यांनी आम्हाला शिकवू नयेत. एकदा फक्त भगिनी महोत्सव येवून पहावा. तर या उलट डॉ.वाईकर दांपत्याकडून महिलांना होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचे आत्मपरीक्षण करावे.