महापालिकेच्यावतीने शहरात स्वॅब तपासणी व लसीरकरणात आघाडी
कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २३८ कोविडचे सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने शहरात स्वॅब तपासणी व लसीकरण मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. मागील आठवडयात महापालिकेतर्फे एकूण ५४५२ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आलेली आहे. दररोज जवळपास ८०० ते ९०० संशयीत कोविड रुग्णांची स्वॅब तपासणी महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. मागील आठवडयातील शहरातील पॉझिटिव्हिटी दर हा ३.४६ इतका आहे. सध्या राज्यात कोविड रुग्णांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता. ज्या नागरीकांना कोविडची लक्षणे आढळून येत आहेत त्यांनी जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करण्याचे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
तसेच कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शनिवार ते सोमवार या तीन्ही सुटटीच्या दिवशी एकूण ४९१३ इतक्या नागरीकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाबाबत नागरीकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. यात ६० वर्षावरील नागरीक व ४५ ते ५९ वयातील व्याधिग्रस्त नागरीकांचा समावेश आहे. तसेच १ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीरकरण करण्यात येणार आहे. तरी पात्र नागरीकांनी जवळच्या नागरी आरोग्य केंद्र अथवा खाजगी हॉस्पीटलमधील लसीकरण केंद्र येथे जाऊन लसीकरण करुन घेण्याचे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलवकडे यांनी केले आहे.