काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या संवेदनशीलता आणि समयसुचकतेमुळे मोठा अनर्थ टळला
मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भिवंडीवरून मुंबईत येत असताना त्यांना परेल येथील एका इमारतीला आग लागल्याचे दिसताच त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून पोलीस आणि फायर ब्रिगेडला माहिती दिली व स्वतः आगीच्या ठिकाणी जाऊन आग लागलेली इमारत व आजूबाजूच्या इमारतीतील लोकांना तात्काळ जागे करून बाहेर काढले. त्यांच्या या संवेदनशीलता आणि समयसुचकतेमुळे मोठा अनर्थ टळला.
केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याविरोधात उपोषण केल्यानंतर नाना पटोले भिवंडी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला गेले होते. भिवंडी येथील कार्यक्रम आटोपून परतताना रात्री दोन वाजेच्या सुमारास नाना पटोले परेल येथून जात असताना लंडन वाईन शॉपच्या इमारतीला भीषण आग लागल्याचे दिसताच त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून आगीच्या ठिकाणाकडे धाव घेतली. त्यांनी स्वतः पोलीस आणि फायर ब्रिगेड, पोलीस आणि मुख्यमंत्री कार्यालयाला फोन करून आगीच्या घटनेची माहिती दिली. तसेच आग लागलेल्या व आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाशांना जागे करून बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. ही संपूर्ण आग आटोक्यात येईपर्यंत पटोले घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी दाखवलेल्या या संवेदनशिलतेबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.