ऑटो रिक्षातून उत्तर भारत भ्रमणाची अनोखी साहसी मोहीम – रजत ओसवाल व डॉ. नम्रता सिंग मोहिमेदरम्यान देणार सामाजिक संदेश
कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर हे नेहमी आगळं वेगळं काही तरी करण्यासाठी जगात भारी म्हणून ओळखले जाते. याची प्रचिती पुन्हा आली आहे. कोल्हापूरचे रजत ओसवाल हे चक्क ऑटो रिक्षातून संपूर्ण उत्तर भारताची सफर करणार आहेत.यामध्ये त्यांच्याबरोबर बेंगळुरू च्या डॉ.नम्रता सिंग असणार आहेत. उत्तर भारत हा हिमालयाच्या पर्वतरांगा यांनी नटलेला आहे. आज पर्यंत सायकल, बुलेट अशा अनेक माध्यमातून अनेकांनी साहसी प्रवास केलेला आहे. पण ऑटोरिक्षातून हा साहसी प्रवास करणे ही बहुधा पहिलीच घटना आहे. या प्रवासाच्या मोहिमेचा कोल्हापुरातून न्यु पॅलेस, कसबा बावडा येथून रविवारी २० डिसेंबर २०२० रोजी सकाळी नऊ वाजता शुभारंभ होणार आहे. या शुभारंभप्रसंगी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव,मालोजीराजे छत्रपती आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रजत ओसवाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ही तीस दिवसांची विशेष मोहीम असून यामध्ये पुणे-मुंबई सूरत वडोदरा- उदयपूर- अजमेर- जयपूर- आग्रा- नवी दिल्ली- शिमला- मनाली- धर्मशाला- डलहौसी- अमृतसर- चंदिगढ- नवी दिल्ली- आग्रा- झाशी- भोपाळ- इंदूर- नाशिक- पुणे या मार्गांवरून ही मोहीम होणार आहे.हा जवळपास ४५०० ते ते ५००० किलोमीटरचा प्रवास यादरम्यान केला जाणार आहे. तसेच या प्रवासादरम्यान ‘स्तनाचा कर्करोग’ आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी ‘एक झाड लावा एक झाड वाचवा’ या दोन समस्यांबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. नम्रता सिंग या डॉक्टर आहेत.त्या याबद्दल अधिक माहिती देताना म्हणाल्या ‘स्तनाचा कर्करोग’ याबाबत जनजागृती नाही. महिला, युवती आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेत नाहीत. तसेच या आजाराची उघडपणे चर्चा ही करण्यास तयार नसतात. त्यामुळे या आजाराच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हा एक गंभीर आजार असून याबाबत स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करणे आणि ‘झाडे लावा झाडे जगवा’ यामुळे पर्यावरणाची हानी कमी होऊन समतोल राखला जाईल असे सामाजिक संदेश देत या मोहिमेअंतर्गत जागृती करण्यात येणार आहे असे डॉ.नम्रता सिंग यांनी सांगितले.
रिक्षा हे सर्वसामान्य लोकांचे दळणवळणाचे साधन आहे. अशाप्रकारे लक्ष वेधून घेणारी रिक्षा लोकांना आकर्षित करून त्यांच्यामध्ये नक्कीच या दोन समस्यांबाबत जागृतता निर्माण होईल, असा विश्वास रजत ओसवाल व डॉ. नम्रता सिंग यांनी व्यक्त केला. या मोहिमेसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेतल्या असून सरावासह मोहिमेसाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस जयेश ओसवाल, आदी उपस्थित होते.