येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून ‘शून्य वीज बिल’ करण्याचे उद्दिष्ट – मंत्री हसन मुश्रीफ

 

येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून ‘शून्य वीज बिल’ करण्याचे उद्दिष्ट – मंत्री हसन मुश्रीफ

शेतकऱ्यांनी शेतातील अतिक्रमणे थांबवून सहकार्याने पाणंद रस्ते पूर्ण करावेत सिद्धनेर्लीत ‘महाराजस्व’ अभियानातून सुशासनाचा जागर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विविध लाभांचे वाटप

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कागल मतदारसंघात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला गती देऊन येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून ‘शून्य वीज बिल’ करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘समाधान शिबीर टप्पा १’ चा शुभारंभ कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथे अत्यंत उत्साहात पार पडला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते फित कापून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री म्हणाले, प्रत्येक घरात सौर ऊर्जा प्रकल्प बसविला तर ३ किलोवॅट च्या प्रकल्पासाठी प्रति प्रकल्प ७८ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच; मतदार संघात घरोघरी पी. एम. सूर्यघर योजना राबवण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.                                                              यावेळी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व आधुनिक शेती अवजारांचे वाटप करण्यात आले, तसेच एचपीव्ही लसीकरण मोहिमेच्या स्टॉल्सचे अनावरण करून मान्यवरांनी विविध विभागांच्या स्टॉल्सना भेटी दिल्या. याप्रसंगी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, ग्रामीण भागातील नागरिक अनेकदा डिजिटल साक्षर नसल्याने त्यांना ई-केवायसी सारख्या प्रक्रियेत अडचणी येतात; अशा वेळी प्रशासनाने केवळ औपचारिकता न पाळता लोकांचे प्रबोधन करावे आणि जागोजागी सुविधा निर्माण करून त्यांच्या अडचणी सोडवाव्यात. रेशन दुकानांवरील बोटाचे ठसे मशीनवर न उमटल्याने धान्य मिळण्यास होणारा त्रास दूर करून प्रत्येक लाभार्थ्याचे १०० टक्के समाधान अशा शिबिरातून करावे, असा सल्ला त्यांनी दिला.            कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात ज्या-ज्या पानंदी शेतकरी खुल्या करून देतील त्या सर्व पानंदी बळीराजा पानंद योजनेमध्ये बसवून तयार करणार. शेतकऱ्यांनी शेतातील अतिक्रमणे थांबवून सहकार्याने पाणंद रस्ते पूर्ण करावेत, असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. बळीराजा पाणंद रस्ता योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सर्व गावांमधील रस्ते यांत्रिकीकरणातून खुले केले जात आहेत आणि येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण होईल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेती उत्पादनात वाढ होत असल्याचा संदर्भ देत त्यांनी ऊस उत्पादन वाढल्याने कारखाने अधिक काळ चालतील आणि त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी येईल, असे नमूद केले.             या सोहळ्यात पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महाराजस्व अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, नागरिकांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार चकरा माराव्या लागू नयेत, हाच या अभियानाचा मुख्य हेतू आहे. पुढिल महिनाभर या माध्यमातून विविध दाखले आणि योजनांचे लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवले जातील, असे सांगून त्यांनी गावकऱ्यांना शाश्वत स्वच्छता आणि वृक्षलागवडीचा मंत्र दिला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ‘शासन आपल्या दारी’च्या धर्तीवर प्रशासन स्वतः लोकांपर्यंत पोहोचत असल्याची ग्वाही दिली, तर समरजित घाटगे यांनी सरकारी योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे महाराजस्व शिबीर हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.          कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना विविध योजनांचे वाटप करण्यात आले. या शिबिरास अंबरीषसिंह घाटगे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, जिल्हा परिषद सदस्य सुयेशा घाटगे, पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील आणि उपसभापती इंद्रजीत पाटील, दिनकर वाडकर गुरुजी, सरपंच तथा प्रशासक दत्तात्रय पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, गट विकास अधिकारी, सिद्धनेर्ली मंडळातील सर्व गावांचे सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या अभियानामुळे सिद्धनेर्ली आणि परिसरातील नागरिकांना एकाच छताखाली सर्व शासकीय सेवा उपलब्ध झाल्या आाहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *