कोल्हापूर विमानतळाच्या वेगवान विकासाबाबत झाली सकारात्मक चर्चा
नवी दिल्लीतील बैठकीत विमानतळाच्या अनेक मुद्यांबद्दल झाले निर्णय, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर विमानतळाच्या विकासाबाबत आज नवी दिल्लीमध्ये बैठक झाली. नागरी हवाई वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टी पहिल्या टप्प्यात २३०० मीटर करणे, त्यानंतर धावपट्टीचा विस्तार ३ हजार मीटर करणे, कोल्हापूरहून मुंबई आणि दिल्लीसाठी नियमित आणि योग्य वेळेत विमानसेवा सुरू व्हावी, कोल्हापूर विमानतळाच्या कॅटॅगिरीमध्ये सुधारणा करावी, उच्च दर्जाची तंत्र सामुग्री कोल्हापूर विमानतळावर कार्यान्वित व्हावी, याबद्दल आज सविस्तर चर्चा झाली. नामदार मुरलीधर मोहोळ यांनी कोल्हापूर विमानतळाच्या गतीमान विकासाबद्दल, विमानतळ प्राधिकरणाला स्पष्ट सूचना दिल्या.
कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी आणि विस्तारीकरणासाठी आज नवी दिल्लीत बैठक झाली. हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक प्रत्येक मुद्दयाचा आढावा घेतला. विमानतळ प्राधिकरणाचे संयुक्त महासंचालक सुरज मल, सदस्य एम. सुरेश, कार्यकारी संचालक सुजय डे, ए.एस. महेशा, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. कोल्हापूर विमानतळाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. त्यामुळे कोल्हापूरातून मुंबई आणि दिल्लीसाठी नियमित आणि सोयीस्कर वेळेत विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. कोल्हापुरातून दिल्लीसाठी थेट विमानसेवा सुरू करता येईल, त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधा अधिक विकसित कराव्यात, विमानतळावर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करावे, याकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधले. त्याला विमानतळ प्राधिकरणाने अनुकुलता दर्शवून, लवकरच त्याबद्दलची चाचणी घेतली जाईल, असे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी सांगितले. सध्या कोल्हापूर विमानतळावर १९३० मीटरची धावपट्टी आहे. पहिल्या टप्प्यात ही धावपट्टी २३०० मीटर होणे गरजेचे आहे. पण त्यासाठी विमानतळ परिसरातील एका रस्त्याला पर्यायी रस्ता देवून, आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. तसेच कोल्हापूर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी हीच धावपट्टी ३ हजार मीटरपर्यंत न्यावी, अशी स्पष्ट सूचना नामदार मुरलीधर मोहोळ यांनी केली. तसेच कोल्हापूर विमानतळाला श्रेणी पाचमधून, श्रेणी सहामध्ये वर्ग करावे, ज्यामुळे मोठया क्षमतेची विमाने कोल्हापुरात येवू शकतील. तसेच जगाच्या नकाशावर कोल्हापूर विमानतळाचे नाव येण्यासाठी अत्याधुनिक सामुग्री आणि पायाभूत सुविधा कोल्हापूर विमानतळावर उपलब्ध व्हावी, त्यातून नजीकच्या भविष्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू व्हावी, या दृष्टीने खासदार महाडिक यांनी मागण्या आणि सूचना केल्या. त्याला नामदार मुरलीधर मोहोळ यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाच्या सर्वच वरिष्ठ अधिकार्यांनी मान्यता दिली. त्यामुळे आजच्या बैठकीतून कोल्हापूर विमानतळाच्या वेगवान विकासासाठी चालना मिळाल्याचे स्पष्ट झाले.