शहीद जवान ऋषीकेश जोंधळेयांच्या कुटुंबियांचे
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून सांत्वन
कोल्हापूर/ (जिल्हा माहिती कार्यालय) : बहिरेवाडी, ता. आजरा येथील शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या कुटुंबियांची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट घेवून सांत्वन केले व दिलासा दिला.
श्री. सामंत म्हणाले, जोंधळे कुटुंबियांसह संपूर्ण गाव शोकसागरात बुडालेले आहे.बहिरेवाडीसारख्या छोट्याशा गावातील ऋषीकेशसारखा एक उदयोन्मुख राष्ट्रीय खेळाडू व जवानाला भारतमातेचे संरक्षण करताना वीरगती प्राप्त झाली. ऐन दिवाळीत एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे जोंधळे कुटुंबीयांवर आकाश कोसळले असून त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे.
श्री. सामंत म्हणाले, ऋषीकेशची बहीण कल्याणी हीने शिवजी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतल्यास तीला शहीद स्फुर्ती केंद्रामार्फत मोफत सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. रोशन बी समंजी कृषी महाविद्यालयामार्फत शहीद जवान ऋषीकेशची बहीण कल्याणी हीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे तसेच भविष्यात तीला याच संस्थेमध्ये नोकरी ही दिली जाईल, असे पत्र मंत्री महोदयांनी सुपूर्त केले.
यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, शिवाजी विद्यापीठोच उप कुलसचिव विलास नांदिवडेकर, विजय देवणे, मुरलीधर जाधव, गडहिंग्लजचे उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, रोशन बी समंजी कृषी महाविद्यालयचे अध्यक्ष रिआजभाई समंजी, बहिरेवाडीचे सरपंच अनिल चव्हाण, उप सरपंच सुरेश खोत यांच्यासह नातेवाई व गावकरी उपस्थित होते.