अतिक्रमण विभागाकडून अंबाबाई मंदिर परिसरातील दक्षिण दरवाज्याला लागून असलेले १० चप्पल लोखंडी रॅक जप्त
कोल्हापूर/प्रतिनिधी : अंबाबाई मंदिर परिसरातील दक्षिण दरवाज्याला लागून असलेले अतिक्रमित १० चप्पल लोखंडी रॅक आज महापालिकेच्यावतीने काढून टाकण्यात आली. शारदीय नवरात्र उत्सव २०२३ करीता श्री अंबाबाई मंदिरात महाराष्ट्र व इतर राज्यातून भाविक दर्शनाकरीता मोठया प्रमाणावर येत असतात. दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांना उत्सव काळात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरीता श्री अंबाबाई मंदिर भोवती असलेले अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. या परिसरात दुकानदारांचे अतिक्रमणाचे प्रमाण वाढल्याने या ठिकाणी आज सकाळी 10.30 वाजल्यापासून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी अतिक्रमण विभागाकडून लोखंडी १० चप्पल रॅक जप्त करण्यात आली. तसेच ४ स्टूल व 1 लाकडी चप्पल ठेवण्याचे कपाटही जप्त करण्यात आले. या कारवाईत १ जेसीबी, २ डंपर, १ ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे सदरची कारवाई करण्यात आली. या ठिकाणावरील अतिक्रमण काढतेवेळी अडथळा निर्माण करणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केलेबाबत गुन्हे नोंद करण्यात आले. नागरिकांची गैरसोय होणार नाही या अनुषंगाने पश्चिम देवस्थान समितीमार्फत महालक्ष्मी दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र चप्पल स्टँडची सोय करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी अतिक्रमण अधिक्षक सचिन जाधव, कनिष्ठ लिपीक सज्जन नागलोत, मुकादम रविंद्र कांबळे, प्रशांत कांबळे, जुना राजवाडा पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक सतिश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस उप-निरीक्षक प्रितमकुमार पुजारी, विभागीय कार्यालय क्र. २ कडील पवडी कामगार, अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांनी केली. सदरची अतिक्रमण कारवाई येथून पुढे अशीच सुरू राहणार असून संबंधीत फेरीवाल्यांनी वाहतूकीस व पर्यटकास कोणताही अडथळा निर्माण करु नये असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.