महाडिक गटाला मोठा धक्का राजाराम कारखान्याचे १२४६ सभासद अपात्र
शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक यांचा समावेश
कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी दिलेल्या निकालानुसार राजाराम कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र झाले आहेत. यात महाडिक कुटुंबातील १० सदस्यांचा समावेश आहे. यात महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे. याबाबतची माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आमदार सतेज पाटील गटाने ही निवडणूक बेकायदेशीर असून फेर निवडणुक घ्यावी अशी मागणी केली आहे.
राजाराम कारखान्याच्या सभासद यादीवरून मोठे राजकारण पेटले होते. निवडणुकीच्या काळात सत्तेचा गैरवापर करून अपात्र सभासदांना पात्र ठरविण्यात आले होते. आज प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्या समोर सुनावणी झाली. यामध्ये राजाराम कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र झाले असून शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबातील १० जणांचा यामध्ये समावेश आहे. आमदार सतेज पाटील गटाच्या बाजूने निकाल लागला आहे.आता हायकोर्टात याचिका दाखल केली जाणार असल्याचे आम सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
सर्वसामान्य सभासदांच्या पाठबळावर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. या निवडणुकीमध्ये एकूण १२३३६ इतके मतदान झाले. त्यामध्ये या अपात्र सभासदांच्या मतदानाचा समावेश होता. म्हणजे नियमित ११००० सभासदांचे मतदान झाले होते. यापैकी ५००० ते ५५०० मते आमच्या आघाडीला मिळाली. त्यामुळे खऱ्या सभासदांचा कौल आमच्या आघाडीला मिळाला होता हे सिध्द झाले आहे. या अपात्र सभासदांमुळे आमच्या उमेदवारांना १२०० ते १२५० मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. जर हे अपात्र सभासद मतदानास पात्र झाले नसते, तर आज कारखान्यावर आमचीच सत्ता आली असती असे सतेज पाटील म्हणाले. अखेर सत्याचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.