Sunday, June 29, 2025
spot_img
Homeताज्याडॉ. विलास शिंदे शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलसचिव

डॉ. विलास शिंदे शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलसचिव

डॉ. विलास शिंदे शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलसचिव

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. विलास नेताजी शिंदे यांची आज शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी निवड करण्यात आली. शिवाजी विद्यापीठाचे ते ११ वे कुलसचिव आहेत. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी डॉ. शिंदे यांना आज नियुक्तीचे पत्र प्रदान केले आणि त्यांचे अभिनंदन करून भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. विलास शिंदे यांना प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन २०१० ते २०१२ या कालावधीत कुलसचिवपद भूषविले आहे. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव म्हणूनही त्यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजाचा ठसा उमटविलेला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सोलापूर येथील पदव्युत्तर शिक्षण केंद्रासह विद्यापीठाच्या विविध विभागांचे उपकुलसचिव म्हणून कामकाज पाहिले आहे. सध्या ते सभा व निवडणुका आणि उद्यान या विभागांसह प्रभारी कुलसचिव पदाचे कामकाजही पाहात होते. तत्पूर्वी, बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठाचा पदार्थविज्ञान अधिविभाग येथे ते पदार्थविज्ञान शास्त्राचे पाच वर्षे अधिव्याख्याता होते. डॉ. शिंदे हे शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी असून एम्.एस्सी. (भौतिकशास्त्र) परीक्षेत शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम आले होते. क्रायोजेनिक्स विषयातील विकासात्मक संशोधनासाठी प्रा. एम्.सी. जोशी पुरस्काराचे ते सहमानकरी आहेत.
वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय असून शिवाजी विद्यापीठ जलयुक्त होण्याच्या दिशेने त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. विज्ञान साहित्यिक म्हणूनही डॉ. शिंदे लोकप्रिय असून त्यांची एककांचे मानकरी, असे घडले भारतीय शास्त्रज्ञ, हिरव्या बोटांचे किमयागार, आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया आणि एककांचे इतर मानकरी ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
त्यांना महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कारांमधील विज्ञान साहित्यासाठीचा ‘महात्मा जोतीराव फुले पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर श्रीमती जी.डी. कुलकर्णी पारितोषिक’, विकासात्मक संशोधनाबद्दल ‘इंडियन क्रायोजेनिक्स कौंसिल’चे ‘प्रा. एम.सी. जोशी पारितोषिक’, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा ‘कृ.गो. सूर्यवंशी साहित्य पुरस्कार,’ मिरजेच्या चैतन्य शब्दांगण साहित्य गौरव पुरस्कारांतील कै. अशोक कोरे स्मृती पुरस्कार, जलसंधारण कार्याबद्दल एन्वायर्नमेंट काँझर्वेशन अँड रिसर्च ऑर्गनायझेशन, चिखली यांचा ‘वसुंधरा पुरस्कार’ आणि विज्ञान प्रसारासाठी लेखन आणि कार्यासाठी इंडियन फिजिक्स असोसिएशन, पुणे यांचा मो.वा. चिपळोणकर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
“सर्व घटकांना सोबत घेऊन मातृसंस्थेचा लौकिक उंचावण्यासाठी काम करणार”
शिवाजी विद्यापीठ ही माझी मातृसंस्था असून तिचा लौकिक उंचावण्यासाठीच मी आजवर काम करीत आलो आहे. या संस्थेच्या कुलसचिव पदाची जबाबदारी ही माझ्या दृष्टीने सर्वोच्च संधी असून येथील सर्व घटकांना सोबत घेऊन या पुढील काळात काम करण्यास प्राधान्य राहील. ही संधी दिल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया नूतन कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments