Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यापूर्ववैमनस्यातून दोघा तरूणांवर तलवार हल्ला एकाचा हात तुटला

पूर्ववैमनस्यातून दोघा तरूणांवर तलवार हल्ला एकाचा हात तुटला

पूर्ववैमनस्यातून दोघा तरूणांवर तलवार हल्ला एकाचा हात तुटला

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवाजी पेठेतील निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक रोडवर पूर्ववैमनस्यातून दोघा तरूणांवर तलवार हल्ला करण्यात आला आहे.यात एका तरुणाचा हात तुटला आहे.तर दुसरा तरूण किरकोळ जखमी झाला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.बोंद्रेनगर – धनगर वाडा आणि लक्ष तीर्थ इथल्या दोन टोळ्यांमधील संघर्षातून हा तलावार हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे
कोल्हापुरातील बोंद्रेनगर रिंग रोड परिसरातील विजय उर्फ रिंकू देसाई याच्या वाढदिवसानिमित्त लावलेले पोस्टर फाडल्याच्या कारणातून बोंद्रे नगर आणि लक्षतीर्थ वसाहत इथल्या तरुणांच्या दोन टोळ्यांमध्ये मागील वर्षीच्या मे महिन्यामध्ये जोरदार राडा झाला होता.त्यावेळेपासून या दोन टोळ्यांमध्ये धुसफूस सुरूच होती . लक्षतीर्थ वसाहत इथला संतोष बोडके याला पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच स्थानबद्ध केले असून, सध्या तो कारागृहात आहे. मात्र त्याचे लक्षतीर्थ वसाहत आणि बोंद्रे नगर, सासने कॉलनी – धनगरवाडा इथले सहकारी गुन्हेगारी कारवायांमध्ये अद्यापही सक्रिय आहेत. आज बोंद्रे नगर धनगर वाडा इथला प्रकाश बबन बोडके आणि त्याचा साथीदार दुपारच्या सुमारास मावा नेण्यासाठी कोल्हापुरातील शिवाजी पेठ परिसरात आले होते. यादरम्यान त्यांच्या पातळीवर असलेल्या कांही तरुणांनी प्रकाश बोडके आणि त्याच्या साथीदाराचा अचानक पाठलाग सुरू केला.जीवाच्या आकांतान प्रकाश बोडके आणि त्याच्या साथीदाराने पलायन करण्याचा प्रयत्न केला .यादरम्यान प्रकाश बोडके हा निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक या रोडवरील एका खासगी रिक्रुटमेंटच्या कार्यालयात घुसला त्यावेळी त्याचा पाठलाग करणाऱ्या हल्लेखोरांनी या कार्यालयात घुसून, त्याच्यावर तलवारीने हल्ला चढवला यात प्रकाश बोडके याचा उजवा हात तुटला गेला आहे. तर त्याचा साथीदार किरकोळ जखमी झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.काही नागरिकांनी याबाबतची माहिती जुना राजवाडा पोलिसांना कळवली . त्यानंतर पोलिसांसह जखमी प्रकाश बोडके याचे साथीदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रकाश बोडके आणि त्याच्या सहकाऱ्याला उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल केले आहे . मात्र प्रकाश बोडके हा गंभीर जखमी झाल्याने, पुढील उपचारासाठी त्याला राजारामपुरी परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते .हल्लेखोरांच्या तपासासाठी स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची ३ पथक विविध ठिकाणी रवाना केली असून, लवकरच हल्लेखोरांना अटक केली जाईल, अशी माहिती शहर पोलीस उप अधीक्षक अजित टिके यांनी दिली.जखमी प्रकाश बोडके याच्यावर २ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले .या दिवसाढवळ्या घडलेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे कोल्हापुरात गँगवॉर पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत असल्याच्या चर्चा होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments