न्यू पॉलिटेक्निकमध्ये ‘मराठी पाऊल पडते पुढे’ चित्रपटाचे प्रमोशन
कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निक या काॅलेजमध्ये ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या नवीन मराठी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन झाले. यासाठी चित्रपटाचे निर्माते प्रकाश बाविस्कर, अभिनेता चिराग पाटील, अभिनेत्री सिद्धी पाटणे आणि त्यांचे सहकारी आले होते.
यावेळी चित्रपटाची झलक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. अभिनेता चिराग पाटील याने उपस्थित विद्यार्थ्यांना नोकरीपेक्षा उद्योग हा करिअरचा मार्ग निवडताना अंगी धाडस बाळगण्याचा सल्ला दिला. अभिनेत्री सिद्धी पाटणे हिने विद्यार्थ्यांना सांगितले की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अपार कष्टाला पर्याय नाही. निर्माते प्रकाश बाविस्कर म्हणाले, ‘मराठी मुलांना आईवडीलांकडून, समाजातून हाच सल्ला मिळतो की शिक आणि छानशी नोकरी कर. या मानसिकतेतून मराठी माणसाला बाहेर काढण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट निव्वळ बोधपट नसून व्यावसायिक मनोरंजनपटही आहे. तुम्ही नक्की याचा आनंद घ्याल. या चित्रपटाचा निव्वळ नफा हा महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी दिला जाणार आहे.’
न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी चित्रपटाच्या टिमचा सत्कार केला आणि चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डाॅ. रविंद्र कुंभार, रजिस्ट्रार नितीन पाटील, विभागप्रमुख, स्टाफ व प्रचंड संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अभिनेता व अभिनेत्रीसोबत सेल्फी काढले. हा चित्रपट ५ मे ला प्रदर्शित होत आहे.